इचलकरंजीत पत्नीचा खून

इचलकरंजीत पत्नीचा खून

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : पतीने बेदम मारहाण करून गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना येथील संग्राम चौकात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. करिश्मा किसन गोसावी (25) असे पत्नीचे नाव असून खुनानंतर घरातील चादरीत मृतदेह झाकून विल्हेवाट लावण्यासाठी तो नेण्याचा प्रयत्न केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. घटनेनंतर पती किसन गोसावी पसार झाला आहे.

कौटुंबिक वादातून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुरू होते. दाट लोकवस्ती असलेल्या भागात झालेल्या खुनाच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

संग्राम चौक परिसरात किसन गोसावी हा पत्नी करिश्मा व तीन मुलांसह भाड्याच्या घरात राहण्यास होता. दोन महिन्यांपूर्वी तो याठिकाणी राहण्यास आला होता. वारंवार पती-पत्नीमध्ये खटके उडत होते. सोमवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्यातून किसनने करिश्माला मारहण केल्याची घटनास्थळी चर्चा होती. करिश्मा यांचा भाऊ आकाश व नातेवाईक हे जवळच भागात राहतात. करिश्मा रात्री नेहमीप्रमाणे घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. घराला कुलूप होते. दिवसभर करिश्मा आढळून न आल्याने नातेवाईकांनी घराचे कुलूप तोडले. तेव्हा घरात करिश्माचा मृतदेह आढळून आला. नातेवाईकांना यावेळी मोठा धक्का बसला. बेदम मारहाण करून गळा आवळून किसनने करिश्माचा खून केला असावा, असा पोलिसांना प्राथमिक कयास आहे. करिश्मा यांच्या खुनाची घटना समजताच नातेवाईकांनी मोठ्या संख्येने धाव घेतली. त्यामुळे पोलिसांना गर्दी हटवून पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करताना कसरत करावी लागली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी भेट दिली.

दिवसभर किसन घुटमळत होता

मृतदेह चादर व इतर कपड्यांमध्ये झाकलेल्या अवस्थेत होता. गोसावी यांची दोन्ही मुले सकाळी दोनवेळा घराकडे आली होती. मात्र किसन याने त्यांना घरात येऊ दिले नाही. हे भागातील नागरिकांच्या निदर्शनास आले. सकाळपासूनच तो घरातून वारंवार डोकावून पाहात होता. मात्र नागरिकांची चाहूल लागताच पुन्हा घर बंद करीत होता. पहाटेच्या सुमारास त्याने हे कृत्य केले असावे असा संशय आहे.

ढकलगाड्यावरून मृतदेह नेण्याच्या प्रयत्नाचा संशय

नातेवाईकांनी सीसीटीव्ही पाहिला असता पहाटे त्याने स्क्रॅप गोळा करण्यासाठीचा ढकलगाडा दारात आणल्याचे तसेच त्यावर काही बॉक्स ठेवल्याचे दिसून आले. मृतदेह कपड्यात झाकलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र भागातील नागरिकांची वर्दळ असल्याने त्याने घराला कुलूप लावून दुपारनंतर पळ काढला असावा असाही संशय आहे. दोन पथकांद्वारे किसनचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. रात्री उशिरा इंदिरा गांधी इस्पितळात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. खुनाचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.

आईची भेट झालीच नाही

गोसावी दाम्पत्याचा एक मुलगा शिक्षणासाठी बाहेर आहे तर उर्वरित दोन लहान मुले रात्री मामाकडेच होती. त्यामुळे सुदैवाने ती बचावली. आईच्या ओढीने दोनवेळा या मुलांनी घराकडे येण्याचा प्रयत्न केला. मात्र घरापासून दूर अंतरापर्यंत किसन याने त्यांना दोनवेळा पिटाळून लावले. करिश्मा यांचा मृतदेह पाहता त्यांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

logo
Pudhari News
pudhari.news