कोयना एक्स्प्रेसने तिघींना चिरडले; दोन महिलांसह मुलीचा मृत्यू

कोल्हापूर :  मार्केट यार्ड परिसरातील रेल्वे ट्रॅकवर अपघातानंतर रात्री उशिरा शववाहिकेसह पोलिस दाखल झाले होते.
कोल्हापूर : मार्केट यार्ड परिसरातील रेल्वे ट्रॅकवर अपघातानंतर रात्री उशिरा शववाहिकेसह पोलिस दाखल झाले होते.
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेसने शुक्रवारी रात्री तिघांना चिरडले. मार्केट यार्डजवळ रात्री आठच्या सुमारास झालेल्या या भीषण दुर्घटनेत दोन महिला आणि लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती. रुळावरून चालत येत असताना ही घटना घडल्याचे काहींनी सांगितले. यामुळे अपघात की आत्महत्या याबाबत घटनास्थळी चर्चा सुरू होती.

मुंबईहून कोल्हापूरला येणारी कोयना एक्स्प्रेस मार्केट यार्डपासून पुढे कोल्हापूर स्थानकाच्या दिशेने येत होती. याचवेळी विक्रमनगरकडून मार्केट यार्डच्या दिशेने या तिघीजणी रुळावरूनच चालत जात होत्या. याचवेळी भरधाव आलेल्या कोयना एक्स्प्रेसने तिघींनाही चिरडले. या धडकेत एक महिला रुळाच्या एका बाजूला तर दुसरी महिला आणि लहान मुलगी दुसर्‍या बाजूला पडल्या.

रेल्वेची धडक इतकी जोरात होती की, दोन महिलांचे चेहरे छिन्नविच्छिन्न झाले. लहान मुलगीही जागीच ठार झाली. दरम्यान दोन महिला, लहान मुलीला धडक बसताच लोको पायलटने रेल्वेचा वेग कमी करत ती काही अंतरावर नेऊन थांबवली. रेल्वे अचानक थांबल्याने परिसरातील नागरिकही रुळाच्या दिशेने आले. यावेळी या तिघींचेही मृतदेह आढळून आले. लोको पायलटने ही माहिती रेल्वेगार्डला दिली. त्याने ही माहिती रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी शाहूपुरी पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक अजय सिंदकर सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले.

घटना घडलेल्या ठिकाणी एका बाजूला वस्ती आहे. दुसर्‍या बाजूला काहीशी विरळ वस्ती आहे. या ठिकाणी पायवाट आहे, त्यावरून लोक ये-जा करत असतात. मात्र, या ठिकाणाहून दोन्ही बाजूंनी येणारी रेल्वेगाडी दूर अंतरावरूनही दिसते. यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना हा अपघात घडल्याची शक्यता कमी आहे. त्यातच या तिघीही रुळावरून चालत येत होत्या, असे काही प्रत्यक्षदर्शनींनी सांगितले. यामुळे हा अपघात की आत्महत्या याबाबत घटनास्थळी चर्चा सुरू होती.

दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. प्रत्येकजण मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनीही परिसरातील नागरिकांना बोलावून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांची ओळख पटली नाही. रात्री साडेअकरा वाजता पोलिसांनी मृतदेही शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात आणले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती.

मुलीच्या चेहर्‍यावरून ओळख पटविणार

मृतातील एक महिला 40 ते 45 तर दुसरी 25 ते 30 वयोगटातील आहे. दोघींचाही चेहरा छिन्नविच्छिन्न झाला आहे. त्यांच्यासोबत असणारी लहान मुलगी दहा ते बारा वर्षांची असावी, असे वाटते. तिचा चेहरा ओळखण्यासारखा आहे. तिच्या मदतीने पोलिसांचा ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news