वरणगेतील तरुणाचा संशयास्पद मृत्यू

वरणगेतील तरुणाचा संशयास्पद मृत्यू

कोडोली, पुढारी वृत्तसेवा : वरणगे (ता. करवीर) येथील मधुकर सखाराम आंग्रे (वय 42) हा तरुण जोतिबा डोंगर येथील गायमुखजवळ विष प्राशन केलेल्या अवस्थेत गुरुवारी सकाळी आढळून आला होता. त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मधुकर याच्यावर विषप्रयोग करून घातपात केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

मधुकर आंग्रे हा कोल्हापुरातील एका खासगी कंपनीत नोकरीस होता. मंगळवारी दुपारी तो कामाच्या ठिकाणाहून बाहेर पडला होता. सायंकाळी घरच्यांनी फोनवरून संपर्क साधला असता, मी मित्रांबरोबर जेवणासाठी बाहेर आलो असून घरी यायला वेळ लागणार आहे, असे सांगितले होते.

रात्री सव्वाबारा वाजता लहान भाऊ सचिनला फोन करून मी घरी सकाळी येणार आहे, असे सांगितले होते. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास मधुकरने फोन करून आपल्यावर काही जणांनी विषप्रयोग केला असून गायमुखाजवळ आणून टाकले आहे, असे सांगितले. नातेवाईकांनी जोतिबा डोंगरावर धाव घेतली. त्याला उपचारासाठी तातडीने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. आपल्यावर तिघाजणांनी विषप्रयोग केल्याची माहितीही मधुकरने दिल्याचे नातेवाईकांनी सांगितले. हे कृत्य मधुकरकडील पैसे हडप करण्याच्या किंवा देणे लागत असलेल्यांनी पैसे बुडवण्याच्या हेतूने केल्याचा संशय मधुकरचे वडील सखाराम व भाऊ सचिन यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कोडोली पोलिसांत तक्रार दिली आहे. त्याच्या मागे आई-वडील, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news