खून का बदला खून की, रील्सची खुन्नस?

खून का बदला खून की, रील्सची खुन्नस?

[author title="सतीश सरीकर" image="http://"][/author]

कोल्हापूर : राजेंद्रनगरमधील कुमार गायकवाड या गुन्हेगाराची शहरातील टाकाळा उड्डाणपूल येथे निर्घृण हत्या झाली. त्या खुनातील आरोपी जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळे पूर्ववैमनस्यातूनच सुजल कांबळे याचा खून झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. राजेंद्रनगरात काही दिवसांपूर्वी मोटरसायकलींची तोडफोड करण्यात आली होती. तसेच काही घरांचे नुकसान केले होते. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. रील्सचे व्हिडीओ करून एकमेकांना आव्हानेही दिली जात होती. त्यामुळे खून का बदला खून की, रील्सच्या खुन्नसमधून सुजलचा खून झाला, हे स्पष्ट आहे.

ईर्ष्येतून एकमेकांची गेम

कोल्हापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः गुंडाराज झाले आहे. 18 ते 20 वर्षांचे तरुण हातात नंग्या तलवारी नाचवत बिनधास्त विरोधी टोळीतील गुन्हेगारांचे भररस्त्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडत आहेत. काही महिन्यांपूर्वी रंकाळ्यासारख्या नेहमी गजबजलेल्या ठिकाणीही अशाच एका गुन्हेगाराची हत्या करण्यात आली. त्यानंतरही शहरात गुन्ह्यांचे सत्र कायम आहे. गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच गुन्हेगारी टोळ्यांत वाढ होत आहे. तसेच खुन्नस आणि ईर्ष्येतून एकमेकांची गेम केली जात आहे; मात्र त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात गांजासह इतर अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे. पोलिसांना गांजा विक्रीची ठिकाणे आणि गांजा ओढत बसणारी गँग माहिती आहेत, तरीही कारवाईचे धाडस केले जात नाही. सुजलसह त्याचे मित्र बसणार्‍या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याची चर्चा त्या परिसरात आहे. त्याबरोबरच शहरात इतर ठिकाणीही सहज गांजा उपलब्ध होत आहे. त्यामुळे कमी पैशात जास्त नशा देणार्‍या गांजाचा भाव वाढला आहे. त्यात तरुणाई गुरफटत चालली आहे. गांजा ओढल्यानंतर कुणाला मारतोय… कशाने मारतोय… कुठे मारतोय… याचे कोणतेच भान संबंधितांना नसते. परिणामी, शहरात भरवस्तीत होणारे खून संबंधित गुन्हेगार गांजा ओढूनच करत असल्याची चर्चा आहे.

रील्समधील खुन्नस जीवावर बेतली

सुजल कांबळे व त्याच्या मित्रांचा सोशल मीडियावरील पोस्टवरून आठ ते दहा दिवसांपूर्वी विरोधी टोळीशी वाद झाला होता. तसेच रोहित जाधव यानेही काही दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त व आव्हान देणार्‍या रील्समुळे वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात आणून पोलिसी हिसका दाखविला होता. त्यानंतरही रील्समधून एकमेकांना आव्हाने देणे सुरूच होते. रील्सच्या खुन्नसमधूनच सुजलचा खून झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तब्येत दणकट असल्याने मित्रांमध्ये पैलवान अशी सुजलची ओळख होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news