कोल्हापुरात 31; हातकणंगलेत 24 फेर्‍या

कोल्हापुरात 31; हातकणंगलेत 24 फेर्‍या

कोल्हापूर, पुढारी वृत्तेवा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवार दि. 4 जून रोजी होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीची सोमवारी दुपारी मतमोजणी केंद्रांवर रंगीत तालीम झाली. सकाळी आठ वाजता टपाली मतदानाने मतमोजणीला प्रारंभ होईल. सकाळी साडे आठ वाजल्यापासून इव्हीएमवरील मतमोजणी सुरू होईल. सकाळी नऊ वाजता पहिल्या फेरीचा निकाल समोर येईल. प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. कोल्हापूर मतदार संघात एकूण 31 फेर्‍या होतील तर हातकणंगलेत 24 फेर्‍या होणार आहेत.

कोल्हापूर मतदार संघातील मतमोजणीसाठी 349 तर हातकणंगले मतदारसंघातील मतमोजणीसाठी 337 कर्मचारी असे एकुण 686 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अतिरिक्त 10 टक्के कर्मचारी दोन्ही ठिकाणी राखीव असणार आहेत. मतमोजणी कर्मचार्‍यांची आज दुपारी तीन वाजता दोन्ही मतमोजणी केंद्रावर रंगीत तालीम (मतमोजणीचे जागेवर प्रशिक्षण) घेण्यात आली. प्रत्यक्ष टेबलवर आवश्यक साहित्य, त्याची टेबलवर ठेवण्याची जागा, मतमोजणी कर्मचार्‍यांनी प्रत्यक्ष बैठक व्यवस्था, आकडेवारी अहवालात भरणे, त्यानंतर ती संगणकीय प्रणालीत भरणे आदीचे प्रशिक्षण यावेळी कर्मचार्‍यांना देण्यात आले.

रमणमळा मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी 600 व राजाराम तलाव येथील मतमोजणी केंद्र ठिकाणी 600 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवार नियुक्त प्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधी यांनाच मतमोजणी केंद्रांवर प्रवेश दिला जाणार आहे.

अन्य सर्वांसाठी मतमोजणी केंद्रांकडे जाणारे मार्गही वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राच्या परिसरात पक्षनिहाय कार्यकर्त्यांच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत, त्याच ठिकाणी त्याच पक्षाच्या, उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना थांबता येणार आहे.

इव्हीएम आणि टपाली मतपत्रिका मोजणीनंतर व्हीव्हीपॅट मोजणार

टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. ईव्हीएम व टपाली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी करण्यात येणार आहे.

अशी होईल मतमोजणी

सकाळी 6 वा : मतमोजणी कर्मचारी, अधिकारी उपस्थिती नोंद
सकाळी 7 वा- स्ट्राँग रूम उघडले जातील
सकाळी 7 वा- मतमोजणी कर्मचार्‍यांचे रॅन्डमायझेशन
सकाळी 7.30 वा- मतमोजणी कर्मचारी नियुक्त टेबलवर बसतील
सकाळी 8 वा- टपाली मतदान मोजणीला प्रारंभ
सकाळी 8.15 वा- स्ट्राँगरूममधून मतदान केंद्र निहाय इव्हीएम मतमोजणी टेबलवर
सकाळी 8.30 वा- इव्हीएमवरील मतमोजणीला प्रारंभ

मतदार संघ निहाय अशा होणार फेर्‍या

कोल्हापूर
चंदगड 28, राधानगरी 31, कागल 26, कोल्हापूर दक्षिण 24, करवीर 26 आणि कोल्हापूर उत्तर 23 फेर्‍या.

हातकणंगले
शाहूवाडी व हातकणंगले प्रत्येकी 24, इचलकरंजी 19, शिरोळ व इस्लामपूर प्रत्येकी 21, शिरोळ 24 फेर्‍या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news