इंडिया आघाडी बहुमत मिळविणार

इंडिया आघाडी बहुमत मिळविणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भाजपने कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी 295 जागांसह बहुमत मिळविणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला. दिल्लीत निकालाआधी शनिवारी इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यानंतर खर्गे बोलत होते. शनिवारी शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडले आणि एक्झिट पोलचे निष्कर्ष येण्याच्या आधीच आणि 4 जूनच्या निकालाआधीच इंडिया आघाडीची ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

दोन तासांच्या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना खर्गे म्हणाले, घटक पक्षांनी मतदानाचा जो आढावा घेतला आहे, त्यानुसार इंडिया आघाडी देशात 295 जागा जिंकत आहे. भाजपने संभ्रम निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी निकालाचे चित्र वेगळेच असणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशात 40 जागा जिंकण्याची आशा आहे, तर बिहारमध्ये 22, महाराष्ट्रात 24, बंगालमध्ये तृणमूलसह 24, राजस्थानात 7, कर्नाटकात 15 ते 16 जागा जिंकण्याची आशा आहे.

प्रमुख नेत्यांची हजेरी

या बैठकीत इंडिया आघाडीतील 23 घटक पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला. काँग्रेस सांसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा, के. सी. वेणुगोपाल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आम आदमी पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदी प्रमुख नेते उपस्थित होते. याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, संजय सिंह, राघव चढ्ढा, द्रमुकचे नेते टी. आर. बालू, राजदचे नेते तेजस्वी यादव, संजय यादव, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, झामुमो नेत्या कल्पना सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, भाकपचे के. डी. राजा, माकपचे सीताराम येच्युरी, शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, सपाचे सरचिटणीस रामगोपाल यादव, भाकप -माले गटाचे दीपांकर भट्टाचार्य आणि व्हीआयपी पक्षाचे मुकेश साहनी आदी नेत्यांनीही बैठकीत सहभाग घेतला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news