करिअरची दिशा ठरवणार्‍या ‘एज्यु दिशा’ प्रदर्शनाचे आज उद्घाटन | पुढारी

करिअरची दिशा ठरवणार्‍या ‘एज्यु दिशा’ प्रदर्शनाचे आज उद्घाटन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि करिअर निवडीबाबत विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी दै. पुढारी ‘एज्यु दिशा’ हे भव्य शैक्षणिक प्रदर्शन आयोजित करत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (दि. 1) कोल्हापुरात सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते होणार आहे.

घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू उद्धव भोसले, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे मार्केटिंग हेड जमीर मुल्ला आणि चाटे शिक्षण समूह कोल्हापूरचे विभागीय संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन, राजारामपुरी येथे हा कार्यक्रम होणार आहे.

शिक्षण आणि करिअरसंदर्भात भविष्याचा अचूक वेध घेणारे, करिअरचे असंख्य पर्याय आणि त्यातून मिळणार्‍या अगणित संधींची माहिती या प्रदर्शनात एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. यामध्ये विद्यार्थी व पालकांना नामांकित शिक्षण संस्थांमार्फत मार्गदर्शन केले जाणार असून उत्तुंग यशाची ध्येय बाळगणार्‍या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या ध्येयप्राप्तीच्या स्वप्नांना यातील व्याख्यानांतून बळ लाभणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पा असलेला दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला असून जीवनाची दिशा ठरवणार्‍या महाविद्यालय प्रवेशाचा निर्णय घेताना विद्यार्थी, पालकांत गोंधळाची स्थिती दरवर्षी कायम असते. अशा विद्यार्थी व पालकांसाठी दै. पुढारी ‘एज्यु दिशा’ मागील अनेक वर्षांपासून वाटाड्याच्या भूमिका चोख बजावत आहे. या प्रदर्शनात करिअरविषयक अचूक मार्गदर्शन तज्ज्ञांकडून केले जाणार आहे.

प्रदर्शनात अनेक शैक्षणिक संस्थांचे स्टॉलही भरवले जाणार असून विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती घेण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक या प्रदर्शनाला भेट देतात. सोबत दररोज तज्ज्ञ वक्त्यांचे व्याखानांचेही आयोजन करण्यात येते. तरी या प्रदर्शन आणि मार्गदर्शनपर व्याख्यानांचा विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दै. ‘पुढारी’मार्फत केले आहे.

आजची व्याख्याने

सकाळी 12 ते 1:

उच्च शिक्षणातील करिअरच्या संधी आणि आव्हाने
वक्ते : डॉ. स्वप्निल हिरीकुडे, विभाग प्रमुख, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग
सध्याच्या अतिवेगवान स्पर्धेच्या युगामध्ये फक्त पदवी शिक्षण अपुरे पडते. सरकारी नोकरी असो मल्टिनॅशनल कंपनीतील नोकरी असो, अत्युच्च पगाराच्या नोकरी असो अथवा संशोधन क्षेत्रामधील करिअर असो, याकरिता उच्च शिक्षण अति महत्त्वाचे आहे. उच्च शिक्षण कुठे आणि कसे घ्यावे? उच्च शिक्षणानंतर संधी कुठे आणि काय काय आहेत? आणि हे करताना काय आव्हाने येतात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन या सत्रात होणार आहे.

सायंकाळी 5 ते 7 :

परदेशी शिक्षण व करिअरच्या संधी
वक्ते : जयंत पाटील, संचालक, फिनेस ओव्हरसिज एज्युकेशन, कोल्हापूर
परदेशात शिक्षण घेणे तसेच शिक्षणानंतर परदेशात नोकरी करण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते; परंतु योग्य मार्गदर्शनाअभावी काही विद्यार्थ्यांचे हे स्वप्न अपुरेच राहते. तसेच काही विद्यार्थी परदेशात शिक्षणाकरिता जातातही; परंतु तिथे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी योग्य मार्गदर्शन घेऊन परदेश शिक्षणाची स्वप्नपूर्ती करण्यासाठीचे मार्गदर्शन या व्याख्यानातून मिळणार आहे.

सायंकाळी 6 ते 7 :

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे भवितव्य आणि करिअरची दिशा
वक्ते : डॉ. सचिन जाधव, सहयोगी प्राध्यापक, पीसीईटी, पिंपरी-चिंचवड विद्यापीठ.
नवीन येऊ घातलेल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाने अल्पावधीतच जीवनातील अनेक गोष्टींमध्ये बदल घडवून आणले आहेत. या तंत्रज्ञानामध्ये जशी प्रगती होत आहे तसे ते अधिक सक्षम होत चालले आहे. याचमुळे या विषयातील करिअरमध्ये अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच हे नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे यामध्ये खूप संशोधन होणे बाकी आहे. याकरिता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे भवितव्य काय आहे आणि करिअरच्या कोणत्या संधी आहेत यावर मार्गदर्शन मिळणार आहे.

दै. ‘पुढारी’तर्फे ‘गुणवंत विद्यार्थी गौरव 2024’

दै. ‘पुढारी’ परिवारातर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील 10 वी आणि 12 वी मध्ये 90 टक्केहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार सोमवार, दि. 3 जून 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे दै. पुढारी आयोजित एज्यु दिशा 2024 प्रदर्शनामध्ये करण्यात येणार आहे; परंतु याकरिता आधी नावनोंदणी करणे गरजेचे आहे, याकरिता शनिवार, 1 जून आणि रविवार, 2 जून रोजी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे गुणपत्रिकेची प्रत आणि आधार कार्ड घेऊन नाव नोंदणी करावी अथवा https:/// t.ly/C9CnL या लिंकवर जाऊन किंवा खाली दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून नाव नोंदवण्याचे आवाहन दै. ‘पुढारी’ तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9834433274, कोल्हापूर ः स्थळ – डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन, राजारामपुरी दिनांक – 1 ते 3 जून वेळ – स. 10 ते रात्री 8.

Back to top button