‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’ आज, उद्या रद्द

‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’ आज, उद्या रद्द

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-मुंबई आणि मुंबई-कोल्हापूर या मार्गावरील रेल्वेसेवा दोन दिवस बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि. 31) व शनिवारी (दि. 1) जाणारी आणि शनिवारी (दि. 1) व रविवारी (दि. 2) येणारी 'महालक्ष्मी एक्स्प्रेस' रद्द करण्यात आली आहे. शनिवारची 'कोयना एक्स्प्रेस' पुण्यापर्यंतच धावणार आहे, तर शनिवारी आणि रविवारी मुंबईहून येणारी 'कोयना एक्स्प्रेस' पुण्यातूनच कोल्हापूरला येणार आहे.

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 10 व 11 चे विस्तारीकरणाचे काम करण्यात येत आहे. याकरिता प्री नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यासाठी दि. 1 जूनच्या मध्यरात्रीपासून दि. 2 जूनच्या दुपारपर्यंत 36 तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या पुण्यापर्यंतच धावणार आहेत. शुक्रवार, दि. 31 मे व शनिवार, दि. 1 जून रोजी कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 17412) रद्द करण्यात आली आहे. शनिवार, दि. 1 जून व रविवार, दि. 2 जून या दिवशी मुंबईहून येणारी मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 17411) रद्द करण्यात आली आहे.

दि. 1 जून रोजी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंत धावणार आहे. पुणे ते मुंबई मार्गावर ही गाडी रद्द करण्यात आली आहे. दि. 1 व दि. 2 जून रोजी मुंबई-कोल्हापूर मार्गावरील कोयना एक्स्प्रेस पुण्यातूनच कोल्हापूरसाठी सुटणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news