

पुढारी ऑनलाईन डेस्क : महायुतीमध्ये जागा वाटपावरुन कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही याबाबतचा ८० टक्के पेपर सोडवला आहे, तर २० टक्के पेपरही सोडवू. असे सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी आज (दि.९) माध्यमांशी बोलताना केले.
हरियाणा निवडणूक विजयानंतर माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "या निवडणुकीने स्पष्ट केले आहे की, फेक नॅरेटीव्ह ब्रेक झाला आहे. लोकसभा निवडणूक दरम्यान फेक नॅरेटीव्ह मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. हा फेक नॅरेटीव्ह लोकांच्या लक्षात आला आहे आणि आता तो संपलेला आहे. लोक भाजपच्या पाठीशी आहेत.
हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी (दि.८) लागले. हरियाणात विजयाची आशा असलेल्या काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीने विजयाचा झेंडा फडकावला. जनतेने देशातील दोन प्रमुख पक्षांना एकाच वेळी जय आणि पराजय दिला. मात्र, काँग्रेसला जम्मू-काश्मीरमधील विजयाचा आनंद साजरा करता आलेला नाही. दुसरीकडे हरियाणातील विजयामुळे भाजपच्या जम्मू-काश्मीरमधील पराभवाचे दुःख आनंदाश्रूंमध्ये बदलले आहे. जम्मू-काश्मीरच्या निकालावर ना कोणी विजयाचा आनंद साजरा करू शकतो ना पराभवाचे दु:ख अशी काहीशी परिस्थिती आहे.