राज्यातील वस्ताद, पैलवानांची गोलमेज परिषद 23 जूनला

राज्यातील वस्ताद, पैलवानांची गोलमेज परिषद 23 जूनला

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कुस्तीतील चुकीच्या गोष्टी थांबविण्यासह या खेळाच्या ऊर्जितावस्थेसाठी येथील खासबाग केसरी कुस्ती मैदान कमिटीच्या वतीने रविवार, दि. 23 जून 2024 रोजी महाराष्ट्रातील शंभरहून अधिक वस्ताद आणि नामांकित मल्लांची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत कुस्तीतील नवी तंत्रे, नियमावली, नुरा कुस्तीबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. यात नामांकित वस्ताद , ज्येष्ठ मल्ल, कुस्तीतील तज्ज्ञ, क्रीडा पत्रकार, कुस्ती निवेदक, कुस्ती अभ्यासक सहभागी होऊन विचार मंथन करणार आहेत. कोनवडे (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील छत्रपती राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनीत सकाळी 11.00 वाजता या परिषदेला प्रारंभ होईल, अशी माहिती संयोजक पै. संग्राम कांबळे यांनी दिली.

कुस्ती ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. भारतीय मल्लांनी ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवत देशाचे नाव सातासमुद्रापार केले आहे. मात्र, सध्या मोजक्या मल्लांमुळे काही चुकीच्या गोष्टींमुळे कुस्ती क्षेत्र बदनाम होत आहे. परिणामी, अनेक प्रामाणिक मल्लांना कुस्ती शौकिनांच्या रोशाला सामोरे जावे लागत असून, गावोगावी होणार्‍या कुस्ती मैदानांना मिळणारा प्रतिसादही कमी होऊ लागला आहे. त्यामुळे चुकीच्या गोष्टींना आळा बसावा, नवोदित मल्लांकरिता काहीतरी ठोस उपाययोजना व्हावी, यासह या खेेळाच्या ऊर्जितावस्थेसाठी खासबाग केसरी कुस्ती मैदान कमिटीतर्फे महाराष्ट्रातील वस्ताद व पैलवानांची गोलमेज परिषद आयोजित केलेली आहे.

कुस्ती क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच खासबाग केसरी कुस्ती मैदान कमिटीच्या वतीने 23 जून 2024 रोजी ही परिषद होणार आहे. यात नुरा कुस्ती, कुस्तीतील दलाल, डोपिंग यावर ठोस उपाययोजना तसेच या खेळातील अद्ययावत तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय कुस्तीची नियमावली, मॅट व मातीतील कुस्ती यावर सखोल चर्चा केली जाणार आहेत. या परिषदेत ज्येष्ठ मल्ल, वस्ताद, क्रीडा पत्रकार, निवेदन मार्गदर्शन करणार असून राज्यातील अधिकाधिक वस्ताद, मल्लांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news