कोल्हापूर : राजेंद्रनगरात 10 वाहनांची तोडफोड; दगडफेक करत तलवारी नाचवल्या | पुढारी

कोल्हापूर : राजेंद्रनगरात 10 वाहनांची तोडफोड; दगडफेक करत तलवारी नाचवल्या

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : वारे वसाहत, संभाजीनगर परिसरात शनिवारी रात्री दोन गटांत झालेली वादावादी आणि हाणामारीच्या पार्श्वभूमीवर दहा ते बाराजणांच्या मद्यधुंद टोळक्याने राजेंद्रनगर झोपडपट्टीसह परिसरात रविवारी मध्यरात्री प्रचंड दहशत माजविली. नंग्या तलवारी, कोयता, एडक्यासह धारदार शस्त्रांनी रस्त्यावरील टेम्पो, रिक्षासह 10 वाहनांची तोडफोड करून मोठे नुकसान केले. प्रमुख चौकासह घरांवर दगडफेक केली. या घटनेमुळे राजेंद्रनगर झोपडपट्टीसह परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. रविवारी दिवसभर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

राजारामपुरी पोलिसांनी टोळीची धरपकड सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत चौघांच्या मुसक्या आवळल्या. सादिक महंमद पाटणकर (वय 19, रा. लक्षतीर्थ वसाहत), शुभम चिंतामणी बुवा (22, रा. कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा, ता. करवीर), सुमित स्वस्तिक कांबळे (19, सुधाकर जोशीनगर, संभाजीनगर), शोएब सिकंदर शेख (20, रा. शिवाजीराव चव्हाण हॉलसमोर, राजेंद्रनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. आणखी काही संशयित पसार आहेत. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले.

टोळक्याने मध्यरात्री 2.30 ते 3 पर्यंत झोपडपट्टी परिसरात धारदार शस्त्रांसह मोठमोठ्या दगडांचा मारा करून 10 वाहनांची तोडफोड केली आहे. बहुतांशी वाहनाच्या काचाही फोडल्या आहेत. टोळक्याने दत्त मंदिर परिसरात मोठमोठ्याने शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचेही संतप्त नागरिकांनी सांगितले. तरुणांच्या दोन गटातील वादावादी अथवा हाणामारीच्या घटनेशी काडीमात्र संबंध नसलेल्या रहिवाशांच्या घरावर दगडफेक करून रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मालमत्तेचे नुकसान करणार्‍या हल्लेखोरांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणीही केली आहे.

पूर्ववैमनस्यातून दोन गटातील वाद पेटला !

पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, शनिवारी (दि. 25) सायंकाळी वारे वसाहत व संभाजीनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणांच्या दोन गटांत वादावादी झाली. दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर गेल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. परिसरातील काही प्रमुखांनी मध्यस्थी करून समेट घडविला. त्यानंतर दोन्ही गटांतील तरुण निघून केल्यानंतर तणाव निवळला होता. मध्यरात्री अडीचच्या सुमारास सहा ते सात दुचाकीवरून दहा ते बाराजणांच्या मद्यधुंद अवस्थेतील टोळक्याने राजेंद्रनगर झोपडपट्टी परिसर गाठले. प्रचंड आरडाओरड, शिवीगाळ करीत रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड सुरू केली. शिवाय तुफान दगडफेक सुरू केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

प्रमुख चौक, रस्त्यावर दगडासह काचांचा खच

हल्लेखोरांकडे धारदार शस्त्रे असल्याच भीतीमुळे कोणीही घरातून बाहेर पडत नव्हते. अर्धा तास टोळक्याचा थरार होता. दत्तमंदिर परिसरात रस्त्यावर दगडांचा, कांचाचा खच पडला होता. टोळ्याच्या कृत्याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांना पाहताच हल्लेखोर अंधारातून पसार झाले. संग्राम मधुकर सोनवणे (वय 29, रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हल्लेखोरांनी वाहनाची तोडफोड, दगडफेक करून 25 हजार रुपयांचे नुकसान केल्याचे म्हटले आहे.

पोलिस अधीक्षक पंडित यांच्याकडून गंभीर दखल

राजेंद्रनगर झोपडपट्टीत टोळक्याने केलेल्या हल्ल्याच्या घटनेची पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गंभीर दखल घेतली आहे. संशयितांना तत्काळ अटक करण्याच्या सूचनाही तपासाधिकारी अनिल तनपुरे यांना दिल्या आहेत. पोलिस अधीक्षकांनी सायंकाळी तपासाचाही आढावा घेतला.

Back to top button