कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषित करणार्‍यांची गय नको; कठोर कारवाई करा | पुढारी

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषित करणार्‍यांची गय नको; कठोर कारवाई करा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पंचगंगा प्रदूषित करणार्‍यांची गय करू नका, कोणालाही पाठीशी घालू नका, त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करा, कारवाईत सातत्य ठेवा, असे आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पंचगंगा प्रदूषण नियंत्रणप्रश्नी डॉ. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

पंचगंगा प्रदूषण नियंत्रणाबाबत राबविण्यात येणार्‍या दीर्घकालीन योजनांना विलंब लागेल. म्हणून नदीचे प्रदूषण होऊ देऊ नका, नव्याने प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घ्या, बांधकाम परवानगी दिल्यानंतर अटी व शर्थींचे पालन होते की नाही, हे तपासा. अटी-शर्थींचा भंग करणार्‍यांना पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देऊ नका, असे सांगत डॉ. पुलकुंडवार म्हणाले, कोल्हापूर व इचलकरंजीच्या एसटीपी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा. जी कामे प्रस्तावित आहेत, त्याची गती वाढवा. कोल्हापूर महापालिकेच्या नव्या 43 एमएलडी क्षमतेच्या एसटीपी प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. त्याची सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. ती लवकर पूर्ण करून, कामकाज लवकर सुरू करा. प्रदूषणामुळे मासेमारी व्यवसायावर होणारा परिणाम व जैविक घटकांना येणारी बाधा, नागरी घनकचरा, पाण्याचा अतिवापर व आरोग्याच्या तक्रारींबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

नैसर्गिक व प्रदूषणमुक्त पंचगंगा नदी प्रवाहित होण्यास प्राधान्य देऊन होणार्‍या प्रदूषणाबाबत सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पर्यावरण अभ्यासक व उच्च न्यायालय नियुक्त समिती सदस्य उदय गायकवाड यांनीही पंचगंगा प्रदूषण प्रश्नी माहिती दिली. बैठकीनंतर डॉ. पुलकुंडवार यांनी दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करून उपस्थित अधिकार्‍यांना सूचना दिल्या.
बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पुणे विभाग नगरपालिका प्रशासन उपायुक्त दत्तात्रय लाघी, जिल्हा नगर प्रशासन सहाआयुक्त नागेंद्र मुतकेकर, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकेचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.

‘प्लास्टिक’प्रश्नी बेधडक कारवाई करा

प्लास्टिकप्रश्नी बेधडक कारवाई करा, मोहीम घेऊन ही कारवाई करा, असे आदेशही बैठकीत डॉ. पुलकुंडवार यांनी दिले. प्लास्टिक वापराविरोधात जनजागृती करा. उत्पादन होणार्‍या ठिकाणांवरही लक्ष ठेवा. कोणते प्लास्टिक वापरावे, याबाबत निश्चितता आहे. त्याचा भंग करणार्‍या सर्व घटकांवर कारवाई करा. याबाबतचे कायदे, कारवाईचे स्वरूप याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारी, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण घ्या अशा सूचनाही त्यांनी केल्या.

गावांसाठी एसटीपीचा प्रस्ताव राज्य शासनाला देणार

महापालिका, नगरपालिका क्षेत्रात एसटीपी उभारले जात आहेत; मात्र नदीकाठावरील मोठ्या गावांतील सांडपाण्याचा मोठा प्रश्न आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत योजनेंतर्गत एसटीपीचा समावेश करावा, याकरिता राज्य शासनाला प्रस्ताव दिला जाईल. तसा प्रस्ताव देण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना सूचना दिल्याचेही डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कचर्‍याचे ढीग कसे?

आपण कोल्हापुरात येताना महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कचर्‍याचे मोठे ढीग पाहिले. असे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ढीग कसे काय आहेत, अशी विचारणा डॉ. पुलकुंडवार यांनी बैठकीत केली.

Back to top button