कर्नाटकातील सीमाभागासाठी कोयनेतून पाणी देण्याची तयारी | पुढारी

कर्नाटकातील सीमाभागासाठी कोयनेतून पाणी देण्याची तयारी

जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : गतवर्षी पाऊस कमी झाल्याने पूर्ण क्षमतेने राज्यातील धरणे भरली नाहीत. त्यामुळे कोयना धरणातून जेमतेम पाणी कृष्णा नदीत सोडले जात आहे. अशातच कर्नाटक राज्यातील अंकली, उगार, कुडची, ऐनापूर ते हिपरगी धरणापर्यंतच्या अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोयना जलाशयातून कर्नाटक सीमाभागासाठी कृष्णा नदीत पाणी सोडण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करून केली आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभागाला कोयनेतून पाणी देण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे.

कृष्णा नदीवरील राजापूर (ता. शिरोळ) येथील बंधारा हा कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर आहे. राजापूर बंधार्‍याच्या पुढील बाजूला महाराष्ट्रातील खिद्रापूर, राजापूरवाडी व सैनिक टाकळी, तर कर्नाटक राज्यात अंकली, येडूर, बुवाची सौंदत्ती, उगार, कुडची, ऐनापूर, कृष्णा कित्तूर यासह हिपरगी धरणापर्यंतच्या गावात कृष्णा नदीत पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना धडपडावे लागत आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधार्‍यातून कर्नाटक राज्यात पाणी सोडल्यास ते कर्नाटक सीभागातील गावांना मिळणार आहे.

त्यामुळे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्राद्वारे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील कृष्णा नदीला पाणी सोडण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती कर्नाटकाचे सार्वजनिक बांधकाम विभागमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. मंत्री जारकीहोळी यांनी रायबाग तालुक्यातील कुडची येथील कृष्णा नदी परिसराला भेट दिल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. त्यानुसार कोयना जलाशयाच्या पाणी पातळीत भर पडली असून कोयना नदीतून कृष्णा नदीला पाणी सोडण्याची विनंती कर्नाटक सरकारने केली होती. या मागणीनुसार महाराष्ट्र सरकारने कृष्णा नदीला पाणी सोडण्याची तयारी दर्शविली असून लवकरच कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाणीप्रश्नी महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात समन्वय : आ. यड्रावकर

राजापूर बंधार्‍यातून कर्नाटकला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याचे वृत्त कर्नाटक राज्यात प्रसिद्ध झाले होते; मात्र पाण्याचा एक थेंबही विसर्ग करण्यात आलेला नाही. पाणीप्रश्नी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात समन्वय आहे. अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच पाटबंधारे विभागाची बैठकही झाल्याची माहिती माजी मंत्री आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. सांगली पाटबंधारे विभागाच्या नृसिंहवाडी कार्यालयाचे शाखा अभियंता रोहित दानोळे यांनी राजापूर बंधार्‍यावर बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाला पत्र दिल्याने चार कर्मचार्‍यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.

Back to top button