दुचाकीला गव्याची धडक; एकजण गंभीर | पुढारी

दुचाकीला गव्याची धडक; एकजण गंभीर

साोहाळे; पुढारी वृत्तसेवा : सोहाळे फाटयाहून सोहाळे गावाकडे जात असताना दुचाकीसमोर गवा आडवा आल्याने विमल मारुती दोरुगडे (वय ७०) व माजी सैनिक सुनील मारुती दोरुगडे (वय ४०) हे दोघेजण जखमी झाले. सदरची घटना शनिवारी (दि.२५) रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, आजरा-गडहिंग्लज मार्गावरील सोहाळे गावात जाणाऱ्या स्त्यावरुन माजी सैनिक सुनील दोरुगडे हे आपल्या दुचाकीवरुन आई विमल यांना घेवून जात होते. दरम्यान, ळेकरांच्या रांगी नावाच्या शेताजवळ दोरुगडे यांच्या दुचाकीच्या गव्यांचा कळप अचानक आडवा आला. कळपातील गवे रस्ता पार करत असतानाच त्यातील मागे राहिलेल्या गव्याची दुचाकीला धडक झाली. धडक होताच दुचाकीवरुन दोघेजणही रस्त्यावर पडले. यामध्ये सुनील यांना हाताला किरकोळ दुखापत झाली असून विमल यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर आजरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता गडहिंग्लज येथे दाखल करण्यात आले.

दरम्यान याबाबतची माहिती समजताच वनविभागाचे वनक्षेत्रपाल स्मिता डाके, वनपाल बाळेश न्हावी, वनरक्षक प्रियंका पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची भेट घेवून विचारपूस केली. गेल्या अनेक वर्षापासून सोहाळे परिसरात गव्यांचा वावर आहे. पिकांच्या नुकसानीबरोबरच प्राणघातक हल्लेही गव्यांकडून होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Back to top button