राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षेसाठी बंदोबस्‍त; अज्ञातांकडून बर्गे काढून कर्नाटकला पाण्याचा विसर्ग | पुढारी

राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षेसाठी बंदोबस्‍त; अज्ञातांकडून बर्गे काढून कर्नाटकला पाण्याचा विसर्ग

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटक राज्याला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याचे वृत्त कर्नाटक राज्यात प्रसिद्ध झाले होते. पाण्याचा एक थेंबही विसर्ग करण्यात आलेला नाही. कर्नाटकात पाणी टंचाई असल्याने 8 दिवसांपूर्वी अज्ञातांनी बंधार्‍याचे काही प्रमाणात बर्गे खुले करून टाकून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. ते पाटबंधारे विभागाने तात्काळ बंद केले आहेत. पुन्हा असा प्रकार घडण्याची शक्यता असल्याने पाण्याच्या सुरक्षिततेसाठी राजापूर बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दरम्यान सांगली पाटबंधारे शाखा नृसिंहवाडी कार्यालयाचे शाखा अभियंता रोहित दानोळे यांनी राजापूर बंधाऱ्यावर बंदोबस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासनाला पत्र दिल्याने दोन पोलीस आणि दोन पाटबंधारे विभागाचे कर्मचारी अशा चार कर्मचाऱ्यांचे दोन पाळीचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर राजापूर येथे शेवटचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. उन्हाळा असल्याने राजापूर बंधाऱ्याच्या पुढे नदीपात्रास बंधाऱ्याची सर्व बर्गे घालून 40 फुटाणे पाणी अडविण्यात आले आहे. पाण्याचा एक थेंबही विसर्ग होत नाही. मात्र बंधा-याच्या खालील बाजूस पाणी पातळी खालावली आहे. कर्नाटक राज्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

आठ दिवसांपूर्वी कर्नाटक हद्दीमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री बंधा-याचे वरील बाजूचे बर्गे काढून नदीमध्ये टाकून पाण्याचा बेकायदेशीर विसर्ग सुरू केला होता.

शासनाची कोणतीही परवानगी नसताना हा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी खालावली होती. तसेच कर्नाटक राज्यातील काही वृत्तपत्रांमध्ये राजापूर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पाण्याचा विसर्ग सुरू नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाल्याने पुन्हा अज्ञातांकडून बंधाऱ्याची बर्गे काढून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावर 24 तास गस्त घालण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button