कोल्हापूर : वय वर्षे 16… वाहनचोरीचे गुन्हे 12 | पुढारी

कोल्हापूर : वय वर्षे 16... वाहनचोरीचे गुन्हे 12

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गजानन महाराजनगर परिसरातील एका सोळावर्षीय बाल गुन्हेगाराकडून जुना राजवाडा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील दीड लाख रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली शुक्रवारी हस्तगत केल्या. 2023 मध्येही त्याच्याकडून नवीन महागड्या 6 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या होत्या.

दहावीपर्यंत शिक्षण झालेला बाल संशयिताला लहानपणीच दारूचे व्यसन जडले. दारूच्या नशेत मोटारसायकलींच्या चोरीचा त्याचा फंडा सुरू झाला. आठ दिवसांपासून रोज वेगवेगळ्या मोटारसायकलींचा तो वापर करीत होता. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख व पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांना त्याच्या कारनाम्यांचा सुगावा लागला. चौकशीसाठी त्यास ताब्यात घेण्यात आले.

कब्जातील मोटारसायकलींची चोरी केल्याची त्याने कबुली दिली. पाठोपाठ चोरीच्या सहा गुन्ह्यांची कबुली देत सर्व वाहने पोलिसांच्या हवाली केली. 2023 मध्येही त्यास राजवाडा पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळीही त्याने नवीन महागड्या सहा मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली होती.

एक-दोनवेळा चोरलेली वाहने त्याने विक्रीचा प्रयत्न केला होता. मात्र योग्य किंमत न आल्याने त्याने बेत रद्द केला. मात्र चोरलेल्या वाहनातील पेट्रोलची विक्री करून त्याने काही काळ मौजमजा केली.

Back to top button