कोल्हापूर : बांगला देशी महिलांना आश्रय; एकास अटक | पुढारी

कोल्हापूर : बांगला देशी महिलांना आश्रय; एकास अटक

कोल्हापूर : बांगला देशी महिलांना आश्रय; एकास अटक पुढारी वृत्तसेवा : घुसखोर बांगला देशी महिलांना कोल्हापुरात आश्रय देत त्यांच्या वास्तव्यासाठी नागदेववाडी (ता. करवीर) येथील खोली मिळवून देणार्‍या विशाल लक्ष्मण कापसे (वय 34, रा. शिवाजी पेठ) याला शुक्रवारी करवीर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी बजावली आहे.

कोणत्याही पुराव्याशिवाय बांगला देशातून भारतात घुसखोरी केलेल्या सुमन राधेश्याम वशिष्ठ ऊर्फ राधा ऊर्फ हमीदा बेगम (वय 28, मूळ गाव नारायणगंज, बांगला देश), खुशी शहाबुद्दीन भुया शेख (25) यांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे. घुसखोर बांगला देशी महिलाकडे सांगलीतून मिळवलेले आधार कार्ड, रेशनकार्डसह पॅन कार्ड आढळून आल्याने कोल्हापूरसह सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाने या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश दिले होते.

बांगला देशी महिलांना नागदेववाडी (ता. करवीर) येथे खोली भाड्याने मिळवून देणारा मध्यस्थ कोण होता, याचाही पोलिस दलामार्फत शोध सुरू होता. चौकशीत शिवाजी पेठ येथील विशाल कापसे याचे नाव निष्पन्न झाले. करवीर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वायचळ यांनी कापसेला ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली.

आणखी काही संशयिताची नावे निष्पन्न

विशाल कापसेसह आणखी काही संशयितांची नावे चौकशीतून पुढे येत आहेत. संबंधितांवरही लवकर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे, असे तपास अधिकारी वायचळ यांनी सांगितले.

संशयिताचा स्वत:च्या नावे भाडेकरार

कापसे याने नागदेववाडी येथील खोलीमालकाशी स्वत:च्या नावे भाडेकरार करून बांगला देशी महिलांना परस्पर खोली भाड्याने दिल्याचे चौकशीत उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button