कोल्हापूर : गडहिंग्लज, कडगाव, सैनिक टाकळीत वादळाने थरकाप; भिंत कोसळून वृद्धेचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : गडहिंग्लज, कडगाव, सैनिक टाकळीत वादळाने थरकाप; भिंत कोसळून वृद्धेचा मृत्यू

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गडहिंग्लज शहरासह भुदरगड तालुक्यातील कडगाव, शेळोली, शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी परिसराला बुधवारी सायंकाळी वादळाने तडाखा दिला. गडहिंग्लजमध्ये तर जेमतेम मिनिटभराच्या वादळाने थरकाप उडवला. शेकडो झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब कलले आणि नागरिकांची प्रचंड त्रेधातिरपीट उडाली. दरम्यान, गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे भिंत कोसळून वृद्धेचा मृत्यू झाला.

वीज खंडित, दुकानदारांची तारांबळ

गडहिंग्लज ः गडहिंग्लज शहरासह परिसरात बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास केवळ मिनिटभर मोठे वादळ आले. मात्र, या वादळाने गडहिंग्लजकरांच्या मनाचा अक्षरशः थरकाप उडविला. मिनिटभराच्या वादळात धुळीचे कण, रस्त्यावरील वस्तू हवेत
भिरकावल्या गेल्याने नागरिक, दुकानदारांची तारांबळ उडाली. वादळी वार्‍याने गिजवणे येथील महिलेचा बळी घेतला. गंगूबाई आप्पासाहेब कापसे (वय 67) असे मृत महिलेचे नाव आहे.

कापसे यांच्या शेजारी त्यांच्या भाऊबंदाच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यांच्या नव्याने झालेल्या स्लॅबवर पॅराफिटचे बांधकाम सकाळी करण्यात आले होते. दरम्यान, साडेचारच्या सुमारास गडहिंग्लज तालुक्यामध्ये काही कालावधीसाठी वादळी वारे झाले होते. या वादळी वार्‍यामध्ये आंब्याच्या झाडाला फटका बसल्याने बरेच आंबे झाडाखाली पडले होते. या वादळात झाडाखालील आंबे आणण्यासाठी गंगूबाई या गेल्या असता, सकाळी बांधलेली पॅराफिटची ओली भिंत 12 फुटांवरून त्यांच्या अंगावर थेट पडल्याने त्या जागीच मृत पावल्या. घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलिस प्रशासनाने जागेवर जाऊन पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अवघ्या काही सेकंदांसाठी आलेल्या वादळाने गंगूबाई यांचा बळी घेतल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत होती.

वार्‍याच्या प्रचंड वेगाने शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. शहरातील वीज गायब झाली होती. केवळ एक मिनिट झालेले वादळ आणखी काही काळ झाले असते, तर शहरात मोठे नुकसान झाले असते. वादळाने दुकाने तसेच जाहिरातींचे डिजिटल फलक फाटून गेले. आनंद कॉलनीत वटवृक्ष उन्मळून पडला. संकेश्वर महामार्गावरही म. दुं. श्रेष्ठी विद्यालयालगत मध्यम आकाराचे झाड एका घरावर पडले. सुदैवाने दोन्ही ठिकाणी जीवितहानी टळली. शहरासह तालुक्यातही या वादळाचा अनुभव आल्याचे सांगण्यात आले.

सैनिक टाकळी येथे शेड पडल्याने प्रवासी जखमी

शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी परिसराला बुधवारी सायंकाळी वादळी वार्‍याचा तडाखा बसला. अचानकपणे सुरू झालेल्या वार्‍यामुळे घरे व छपरांवरील पत्रे शेकडो फूट दूर जाऊन पडले. वादळी वार्‍यापासून बचावासाठी एका शेडचा आधार घेतलेल्या, सदलगा येथील प्रवाशाच्या अंगावर शेड पडले. त्यात प्रवाशाचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. नागरिकांनी त्याला तत्काळ अ‍ॅम्ब्युलन्समधून सांगली सिव्हिल हॉस्पिटलकडे रवाना केले. पाऊस कमी आणि प्रचंड वारा, यामुळे परिसरातील विजेचे खांब कोसळून विद्युततारा लोंबकळू लागल्याने, विद्युतप्रवाह खंडित झाला आहे. टाकळी परिसरातील नागरिकांचे शेतीचे व घरांचे तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे प्रशासनाने मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल यांच्यामार्फत तत्काळ पंचनामे करून आपत्तीग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

कडगाव परिसरला झोडपले

कडगाव : भुदरगड तालुक्यातील कडगाव-शेळोली परिसराला पुन्हा वादळी वार्‍याचा तडाखा बसला. विजांच्या कडकडाटासह जोरदार वळीव झाला. यामुळे शेळोली येथील सदाशिव चव्हाण यांच्या राहत्या घराच्या दुसर्‍या मजल्यावरील सर्व पत्रे उडून, त्यांचे अंदाजे 25 हजारांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा तलाठी अशोक कुंभार, कोतवाल अशोक चव्हाण, पोलिसपाटील दत्तात्रय कांबळे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. जोरदार वारे आणि पाऊस यामुळे परिसरातील काही गावे अंधारात आहेत. गावांचा पाणीपुरवठा ठप्प होत आहे. सध्या उन्हाळी भुईमूग, तीळ, मूग आदी पिके काढणी चालू असताना गेले आठवडाभर सतत वळीव येत असल्यामुळे, पिके काढायची कशी व त्यानंतर वाळवायची कशी? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

Back to top button