कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक साठी २१४ उमेदवार रिंगणात

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक साठी २१४ उमेदवार रिंगणात

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक साठी शुक्रवारी (दि. 3) अर्ज भरण्याची मुदत संपली, त्यावेळी दुबार वगळता 214 उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले. बँकेच्या 21 जागांसाठी एकूण 368 अर्ज दाखल झाले आहेत. उर्वरित नऊ गटांत सर्वपक्षीय उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. दरम्यान, सोमवारी (दि. 6) अर्जांची छाननी झाल्यानंतर उमेदवारांचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे.

आजरा तालुक्यातून बँकेचे ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) संचालक अशोक चराटी यांच्यासह चार उमेदवार रिंगणात आहेत. भुदरगड तालुक्यातून संचालक रणजित पाटील आणि के. पी. पाटील यांच्यासह आठ उमेदवार इच्छुक आहेत. चंदगड तालुक्यातून संचालक, आमदार राजेश पाटील यांच्यासह चौघे रिंगणात आहेत. गडहिंग्लज तालुक्यातून विद्यमान संचालक संतोष पाटील यांच्यासह विनायक पाटील, संग्राम कुपेकर यांच्यासह सातजण आहेत. गगनबावड्यातून पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह अन्य त्यांच्याच गटाचे दोघे मैदानात असल्याने पाटील यांची निवड बिनविरोध होणार आहे.

हातकणंगले तालुक्यातून माजी आमदार अमल महाडिक आणि संचालक महादेवराव महाडिक यांच्यासह सहाजण मैदानात असल्याने येथील निवड बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. करवीर तालुक्यातून संचालक, आमदार पी. एन. पाटील, जि. प. अध्यक्ष राहुल पाटील यांच्यासह चौघे असल्याने आ. पाटील यांची निवड सहज सोपी होणार आहे. कागल तालुक्यातून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सहाजण रिंगणात आहेत. भाजपने माघार घेतल्यास मुश्रीफ यांची बिनविरोध निवड होणार आहे. पन्हाळा तालुक्यातून संचालक, आमदार डॉ. विनय कोरे यांच्यासह सहाजणांनी अर्ज भरला.

राधानगरी तालुक्यातून संचालिका अर्चना पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्यासह चौघे रिंगणात असले, तरी ए. वाय. यांची निवड बिनविरोध करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. शाहूवाडी तालुक्यातून संचालक सर्जेराव पाटील आणि मानसिंग गायकवाड यांच्यासह चौघे रिंगणात असले, तरी पाटील आणि गायकवाड यांच्यातच थेट लढत होणार आहे.

प्रक्रिया गटात 18 उमेदवार ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

कृषी पणन- शेती माल प्रक्रिया गटातून 18 उमेदवार रिंगणात आहेत. संचालक, खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आवाडे आणि संचालक बाबासाहेब पाटील इच्छुक आहेत. आ. विनय कोरे यांनी बाबासाहेब पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत या गटातून प्रदीप पाटील-भुयेकर यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली आहे. खा. संजय मंडलिक यांची जागा निश्चित असून तडजोडीच्या राजकारणात येथील दुसरी एक जागा कोणाला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

बँका पतसंस्था गटात 34 इच्छुक ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

बँका आणि पतसंस्था गटात आ. प्रकाश आवाडे, संचालक अनिल पाटील, प्रा. जयंत पाटील, अर्जुन आबिटकर यांच्यासह 34 इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत अनिल पाटील भाजप आघाडीकडून निवडून आले होते. येथील जागेसाठी आ. आवाडे यांनीही जोर लावला आहे. जनसुराज्य पक्ष येथील जागेवर प्रा. जयंत पाटील यांच्यासाठी आग्रही आहे.

इतर शेती संस्था गटातून 36 उमेदवार

इतर शेती संस्था आणि व्यक्ती सभासद गटातून संचालक प्रताप माने यांची उमेदवारी निश्चित मानली जाते; मात्र या गटातून तब्बल 36 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

महिला गटातून 30 अर्ज दाखल

महिला गटातून संचालिका, माजी खा. निवेदिता माने आणि उदयानी साळुंखे यांच्यासह 30 महिला उमेदवार इच्छुक आहेत. बँकेच्या राजकारणात थेट प्रवेश मिळवण्यात अडचणी आल्याने कारभारणीला संचालक करण्याचा अनेकांचा इरादा आहे. अनेकांनी सौभाग्यवतींना उमेदवारी मिळावी, यासाठी फिल्डिंग लावली आहे.

शिरोळचा तिढा कायम

शिरोळ तालुक्यातून राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह माजी खासदार राजू शेट्टी आणि गणपतराव पाटील मैदानात आहेत. चर्चेनंतर राजू शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. गणपतराव पाटील यांना शेट्टी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यात मंत्री यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news