होमिओपॅथी कॉलेजच्या गुणवत्ता वाढीस हातभार

होमिओपॅथी कॉलेजच्या गुणवत्ता वाढीस हातभार

कोल्हापूर : होमिओपॅथी उपचारांकडे वाढलेला लोकांचा कल पाहता राष्ट्रीय होमिओपॅथी कौन्सिलने होमिओपॅथी डॉक्टरांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता होमिओपॅथी कॉलेजमध्ये 28 ऐवजी 40 पूर्णवेळ प्राध्यापकांची नियुक्ती करणे बंधनकारक केले आहे. यामुळे महाविद्यालयांच्या गुणवत्ता वाढीस हातभार लागणार आहे.

होमिओपॅथी ही अ‍ॅलोपॅथीला पर्यायी असणारी औषधोपचार पद्धती आहे. होमिओपॅथीचे औषध देताना रुग्णाचे व्यक्तिमत्त्व, आवडी-निवडी, सवयी आणि आरोग्य विचारात घेऊन उपचार केले जातात. अलीकडे असे उपचार घेणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय होमिओपॅथी कौन्सिलने महत्त्वाचे नियम व मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यासंदर्भातील राजपत्र 11 मार्च, 2024 रोजी प्रसिद्ध झाले आहे. नवीन नियम येत्या नवीन शैक्षणिक सत्रापासून लागू होणार आहेत.

'आयुष' मंत्रालयाने नवीन शैक्षणिक धोरण तयार केले आहे. नियमांमध्ये तपासणीसाठीची मार्गदर्शक तत्त्वे, पायाभूत व भौतिक सुविधा जागांची संख्या वाढवणे, वेतनश्रेणी निश्चिती, नियमांचे पालन न करणार्‍या महाविद्यालयांची मान्यता रद्द करणे आदी गोष्टींचा यात समावेश आहे. होमिओपॅथी मैटेरिया मेडिका, दर्शनशास्त्र व मनोविज्ञान, होमिओपॅथी फार्मसी, मानव शरीर रचना, फॉरेन्सिक चिकित्सा, शल्यचिकित्सा, स्त्रीरोग व प्रसूती आदी विभागांमध्ये 40 प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर व सहायक प्रोफेसर नियुक्त केले जाणार आहेत. होमिओपॅथी रुग्णालय 25 बेडवरून 50 बेडचे होणार आहे. रुग्णसंख्या तपासणी 300 केली आहे. तसेच नव्याने संशोधन व योगा हे विभाग सुरू करण्यात आले आहेत.

महाविद्यालयातील प्रत्येक वर्गात आणि प्रयोगशाळेतदेखील सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य असणार आहे. होमिओपॅथी कॉलेजचे ऑनलाईन मॉनिटरिंग कौन्सिलकडून केले जाणार आहे. यात विद्यार्थी उपस्थिती, प्रयोगशाळेचा वापर, महाविद्यालयात येणार्‍या रुग्णांवर योग्य उपचार व औषधे याची माहिती घेतली जाणार आहे. प्रत्येक महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज कॉलेजकडून कौन्सिलला सादर करावे लागणार आहे.

जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता

महाराष्ट्रात सुमारे 60 हून होमिओपॅथी कॉलेज आहेत. यात 1 सरकारी आणि उर्वरित खासगी आहेत. या सर्व महाविद्यालयांमध्ये मिळून यूजीच्या सुमारे 4 हजारांहून अधिक जागा आहेत. आता नव्या नियमानुसार या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

logo
Pudhari News
pudhari.news