Kolhapur Lok Sabha | राज्यात कोल्हापूरची बाजी, ७०.३५ टक्के मतदान

Kolhapur Lok Sabha | राज्यात कोल्हापूरची बाजी, ७०.३५ टक्के मतदान
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत मंगळवारी चुरशीने मतदान झाले. कोल्हापूरने राज्यात बाजी मारली असून 70.35 टक्के, तर हातकणंगलेत 68.07 टक्के मतदान झाले. मतदानाची अंतिम टक्केवारी उद्या (बुधवार) दुपारपर्यंत जाहीर होणार आहे. निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे.

कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे शाहू महाराज आणि महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यासह 23 उमेदवारांचे, तर हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेनेचे सत्यजित पाटील-सरूडकर, महायुतीचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी पक्षाचे माजी खासदार राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील यांच्यासह 27 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले. मतदारांनी कौल कोणाला दिला, हे आता 27 दिवसांनंतर स्पष्ट होईल.

मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष 4 जूनकडे लागले आहे. दोन्ही मतदारसंघांत 90 बॅलेट युनिट, 45 कंट्रोल युनिट, तर 58 व्हीव्हीपॅट अशी एकूण 193 ईव्हीएम बदलण्यात आली. मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हे नोंद करण्यात येणार असून, यापैकी 5 गुन्हे प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. जाधववाडी येथील मतदान केंद्रावरील कर्मचार्‍यांनी जेवणासाठी काही वेळ मतदान प्रक्रियाच थांबवली. सोमवार पेठेतील एका केंद्रावर असाच प्रकार घडला. मतदानासाठी येणार्‍या एका वृद्ध मतदाराचा उत्तरेश्वर पेठ येथे मृत्यू झाला. एका केंद्रावर बोगस मतदानाच्या संशयावरून, तर काही केंद्रांवर व्हीव्हीपॅटमध्ये दिसणार्‍या चिठ्ठ्या खाली पडत नसल्याच्या कारणास्तव काहीसा गोंधळ झाला. हातकणंगले मतदारसंघातील साखराळे (ता. वाळवा, जि. सांगली) येथे खा. धैर्यशील माने व सत्यजित पाटील-सरूडकर यांच्या समर्थकांत राडा झाला. हे प्रकार वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत झाली.

कोल्हापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज आणि महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार खासदार संजय मंडलिक अशी दुहेरी लढत झाली. हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील-सरूडकर, महायुतीचे शिवसेनेचे खा. धैर्यशील माने, स्वाभिमानी पक्षाचे, माजी खासदार राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील अशी चौरंगी लढत होती. आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघालेल्या या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. ही चुरस मतदानाच्या दिवशीही दिसली.

वयोवृद्ध, दिव्यांग मतदारांनी सकाळीच बजावला हक्क

गेल्या काही दिवसांपासून असणारा उन्हाचा तडाखा, दुपारी वाढणारे तापमान, यामुळे अनेक मतदान केंद्रांवर सकाळच्या टप्प्यात बहुतांशी वयोवृद्ध, दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी आलेल्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना मतदान केल्यानंतर केंद्राध्यक्षांकडून जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येत होते.

नवमतदारांचा उत्साह

प्रथमच मतदान करणार्‍या नवमतदारांचा उत्साह दांडगा होता. सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर प्रथम मतदान करणार्‍या तरुण-तरुणींची गर्दी होती. अनेक जण सहकुटुंब मतदानाला येत होते. दोन्ही मतदारसंघांत सुमारे दीड लाखाहून अधिक मतदारांनी प्रथमच मतदान केले.

दुपारपर्यंत मतदानाचा वेग कायम

सकाळपासून मतदानाचा असलेला वेग 9 वाजल्यानंतर काहीसा वाढला. मतदानाचा हा वेग दुपारी एक वाजेपर्यंत कायम होता. दरम्यान, उन्हामुळे काही केंद्रांवरील गर्दी कमी झाली. काही ठिकाणी तर शुकशुकाट होता. मात्र, काही केंद्रांवर दुपारच्या सत्रातही मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी एक ते तीन यादरम्यान दोन्ही मतदारसंघांत सरासरी 12 ते 14 टक्के मतदान झाले. काही काळ मतदानाचा वेग कमी झाला होता.

दुपारी तीननंतर पुन्हा गर्दी

दुपारी तीन-चारनंतर मतदान केंद्रांवर पुन्हा गर्दी वाढू लागली. यामुळे सायंकाळीही काही मतदान केंद्रांवर रांगा लागल्या. अखेरच्या तासातही काही मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी होती. ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर मतदारसंघात सरासरी 64 टक्के, तर हातकणंगले मतदारसंघात सरासरी 63 टक्के मतदान झाले होते.

अखेरच्या तासातही मतदानासाठी गर्दी

मतदानाची वेळ सायंकाळी सहापर्यंत होती. यामुळे दुपारी तीन वाजल्यापासूनच कार्यकर्ते मतदान न केलेल्यांना मतदान करण्यासाठी विनंती करत होते. जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही मतदान करण्याबाबत जनजागृती करत घरी जाऊन मतदारांची भेटही घेत होते. यामुळे अखेरच्या तासात सायंकाळी पाच ते सहा या वेळेत मतदानासाठी गर्दी झाली होती. काही मतदान केंद्रांवर सहानंतरही मतदार रांगेत असल्याने त्यांचे उशिरापर्यंत मतदान पूर्ण झाले. मतदानाची प्रक्रिया रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू होती.

पहाटेपर्यंत ईव्हीएम गोदामात सील करण्याची प्रक्रिया

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा ज्या ठिकाणाहून मशिनसह साहित्य वाटप झाले, त्याच ठिकाणी मतदान पथकांकडून ईव्हीएम आणि सर्व साहित्य तपासून जमा करून घेतले जात होते. यानंतर जमा झालेली ईव्हीएम एस.टी.च्या कार्गो सेवेतील बसेसमधून विशेष पोलिस बंदोबस्तात कोल्हापूर येथील मतमोजणी केंद्रातील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात येत होते. त्यानंतर निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत गोदाम सील करण्यात येत होते.

1 हजार 993 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग

दोन्ही मतदारसंघांतील एकूण 3 हजार 986 मतदान केंद्रांवर मतदान झाले. यापैकी 1 हजार 993 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग (सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे थेट प्रसारण) करण्यात आले. त्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी स्तरावर दोन नियंत्रण कक्ष होते. त्याद्वारे मतदान केंद्रांवर नजर ठेवण्यात येत होती. आक्षेपार्ह बाबी, गोंधळ, मतदारांची गर्दी आदी बाबी निदर्शनास येताच, नियंत्रण कक्षातून केंद्राध्यक्ष, झोनल ऑफिसर यांना सूचना देण्यात येत होती.

मतदान सुरू होण्यापूर्वीच रांगा

* सकाळी सहा वाजता मतदान केंद्रांवर 'मॉक पोल' (मतदान यंत्र चाचणी) झाले. यानंतर सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला. तत्पूर्वीच अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या.
* पहिल्या दोन तासांत कागलमध्ये 8.98 टक्के, कोल्हापूर दक्षिणमध्ये 9.06 टक्के, तर करवीरमध्ये 11.71 टक्के मतदान
झाले.
* कोल्हापूर मतदारसंघात पहिल्या दोन तासांत सरासरी 8.08 टक्के मतदान झाले. हातकणंगले मतदारसंघात शिरोळ आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच चुरस होती. या दोन्ही मतदारसंघांत अनुक्रमे 8.2 आणि 8.5 टक्के मतदान झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news