मुख्यमंत्री शिंदे यांचा कोल्हापुरात रोड शो

मुख्यमंत्री शिंदे यांचा कोल्हापुरात रोड शो

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी भर दुपारी रखरखत्या उन्हात कोल्हापूर शहरात रोड शो केला. सुमारे दीड तास चाललेल्या रोड शोमध्ये मोटारसायकलींसह तरुणांनी प्रचंड गर्दी केली. भगवे झेंडे, भगवे फुगे, भगवे टी शर्ट, धनुष्यबाणाच्या प्रतिकृती यामुळे शहरात भगवे वादळ तयार झाले होते. यावेळी संजय मंडलिक यांना विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. 'मान गादीला अन् मत मोदींना म्हणजेच मंडलिक यांना' असे आवाहनही त्यांनी केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा रोड शो झाला. कोल्हापूर शहराच्या वेगवेगळ्या भागातून सकाळी 10 पासूनच मोटारसायकल घेऊन कार्यकर्ते गळ्यात स्कार्फ, कपाळावर शिवसेना अक्षरे लिहिलेली पट्टी बांधून एकत्रित येत होते. त्यामुळे दसरा चौक भगवे झेंडे आणि कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता. उन्हाच्या झळा सोसूनही कार्यकर्त्यांत उत्साह संचारला होता. शिवसेनेचा जयघोषही सुरू होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दसरा चौकात दुपारी 12.30 वा. आगमन झाले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर त्यांच्या सोबत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्ते शिवसेनेचे भगवे झेंडे फडकवत मुख्यमंत्री शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. मुख्यमंत्री शिंदे व क्षीरसागर यांनी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. त्यानंतर रोड शो सुरू झाला. मात्र प्रचंड गर्दी असल्याने रोड शोचा मार्ग बदलण्यात आला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

दसरा चौकातून रोड शो सुरू झाला. मुख्यमंत्री शिंदे, क्षीरसागर, सुजित चव्हाण, आदिल फरास, राहुल चव्हाण यांच्यासह इतर विकास रथावर होते. मुख्यमंत्री शिंदे हात उंचावत उपस्थितांना विजयाची खूण दाखवत महायुतीचे उमेदवार मंडलिक यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन करत होते. विकास रथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या.

शिंदे यांच्या रोड शोमध्ये कोल्हापुरातील शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होते. सुरुवातीला मोटारसायकलवर कार्यकर्ते आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, क्षीरसागर आदी नेतेमंडळी असलेला विकास रथ होता. त्यापाठोपाठ प्रचारासाठी फिरणार्‍या रिक्षांसह इतर वाहनांत महिला बसल्या होत्या. दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक या मार्गावरून रोड शो झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून रोड शो झाल्यानंतर निवृत्ती चौकात संपला. दरम्यान, रोड शो दरम्यान एक चिमुकला शिवसेनेच्या विजयाच्या घोषणा देत मुख्यमंत्री शिंदे असलेल्या विकास रथावर आला. त्याला कडेवर घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याचे कौतुक केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news