कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सैनिकी निवासी पॅटर्न शाळेतील 34 विद्यार्थी 2 शिक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांना रविवार सायंकाळी अचानक पोटात दुखून जुलाब, उलटी, मळमळ असा प्रकार सुरू झाला. तत्काळ त्यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुपारी झालेल्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती डॉ. रेखा तराळ यांनी दिली. जिल्हा वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. अन्न, औषध प्रशासन अधिकारी महेश मासाळ यांनी सोमवारी सकाळी रूग्णालयात जाऊन अहवाल तयार केला आहे.
दरम्यान विद्यार्थी आणि शिक्षकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर कुरुंदवाड शहर डॉक्टर असोसिएशनच्या शहरातील सर्व डॉक्टरांनी विद्यार्थ्यांच्यावर उपचार सुरू केले. निवासी शाळेत झालेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
रविवारी दुपारी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या जेवणाबरोबर बासुंदी देण्यात आली होती. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांना अचानक पोटात दुखून मळमळ, उलटी, जुलाब आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. अशक्तपणा येऊ लागल्याने ३४ मुलांना त्रास सुरू झाला. त्याचबरोबर २ शिक्षक आणि २ कर्मचाऱ्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुलांची संख्या जास्त असल्याने डॉ. किरण अनुजे, डॉ. सारंग कोकाटे यांच्यासह नर्सिंग स्टाफची धावपळ सुरू झाली.
बधितांची संख्या जास्त असल्याने डॉ. अनुजे यांनी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश पट्टेकरी यांना संपर्क साधून माहिती दिली. शहरातील डॉ. धनंजय पाटील, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. फल्ले, डॉ. कुलकर्णी, डॉ. उमेश लंबे आदीसह सर्वच डॉक्टर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आणि विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले.
१४ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून ६ कर्मचारी आणि १५ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. शाळेचे चेअरमन प्रा. शरदचंद्र पराडकर यांनी दुपारच्या सत्रात जेवनानंतर जादा पाणी पिल्याने हा प्रकार घडला आहे. आता मुलांची प्रकृती स्थिर आहे, असे सांगितले.
३४ विद्यार्थी, दोन शिक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांना गॅस्ट्रो सदृश्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसते. दुपारच्या जेवणावेळी एकत्रित जेवण करत असताना शरीरात नवीन रोग निर्माण करणाऱ्या जीवांच्या संपर्कात आल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी तयार होते. अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता जास्त असते. असाच प्रकार असल्याचे डॉ. किरण अनुजे, डॉ.सारंग कोकाटे यांनी सांगितले.
हेही वाचा