कोल्हापूर : लम्पीला रोखण्यासाठी मेपासून लसीकरण | पुढारी

कोल्हापूर : लम्पीला रोखण्यासाठी मेपासून लसीकरण

विकास कांबळे

कोल्हापूर :  गायवर्गीय पशुधन मालकांमध्ये धडकी भरविणार्‍या लम्पी स्कीन आजाराला रोखण्यासाठी पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. मे महिन्यापासून गायवर्गीय जनावरांच्या लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात येणार असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी ती पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे अडीच लाख डोस उपलब्ध करण्यात आले आहेत.

राज्यामध्ये दोन वर्षांपूर्वी 2022 मध्ये ‘लम्पी’ने थैमान घातले होते. त्याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्वेकडील तालुक्यांना चांगलाच बसला होता. अपूर्ण मनुष्यबळ, नवीन आजार असल्यामुळे उपचाराबाबतची अस्पष्टता, यामुळे पशुपालक हैराण झाले होते. या आजाराचा संसर्ग वाढू लागल्याने जनावरे दगावण्याची संख्याही वाढू लागली. त्यामुळे यंत्रणादेखील हडबडली होती; परंतु यावर लस उपलब्ध झाली. तसेच ‘लम्पी’ने दगावलेल्या जनावरांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केल्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला. सन 2022 मध्ये सुमारे 23 हजार गायवर्गीय जनावरांना लम्पीची लागण झाली होती. लस उपलब्ध झाल्यामुळे गेल्या वर्षी 2023 मध्ये ही संख्या निम्म्यावर आली.
हा रोग होऊ नये म्हणून जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील गायवर्गीय जनावरांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. एलसीडी लस असे लसीचे नाव आहे. याशिवाय सर्व जनावरांकरिता घटसर्प व फर्‍या आणि शेळ्या-मेंढ्यांमध्ये आढळणार्‍या आंत्रविषारवरदेखील लस देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात लम्पीचे पहिले गायवर्गीय जनावर हातकणंगले तालुक्यात सापडले होते. त्यामुळे लसीकरणास दि. 1 मेपासून हातकणंगले तालुक्यातून सुरुवात करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 2 लाख 75 हजार 113 गायवर्गीय जनावरे असून, त्या सर्वांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

साधारणपणे पावसाळ्यात लम्पीची साथ पसरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दि. 31 मेपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी गायवर्गीय पशुधनमालकांनी आपल्या जनावरांची नोंद करणे आवश्यक आहे. लसीकरणासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे.
– डॉ. प्रमोद बाबर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प.

Back to top button