कोल्हापूरवर टोल लादणार्‍यांना मत देणार की घालविणार्‍यांना? : फडणवीस | पुढारी

कोल्हापूरवर टोल लादणार्‍यांना मत देणार की घालविणार्‍यांना? : फडणवीस

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरवर टोल लादणार्‍यांचे उमेदवार कोण आहेत? हे कोल्हापूरकरांना माहीत आहे. टोल घालविणार्‍यांना मत देणार की लादणार्‍यांना? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविजय संकल्प सभेत ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, ही लढाई संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज, माने विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही; तर नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. ‘मान देऊया गादीला आणि मत देऊया मोदीला’ हे कोल्हापूरच्या जनतेने ठरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातही विकासाची कामे झाली. कोल्हापूर हा छत्रपती शिवरायांचा जिल्हा आहे. देशभक्तांचा जिल्हा आहे. भगव्याच्या मागे असणारा जिल्हा आहे. मोदींनी देशाला सुरक्षित आणि विकसित केले. देशाला स्वाभिमान दिला. पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर पूर्वीचे पंतप्रधान अमेरिकेत जाऊन तक्रार करायचे. पंतप्रधान मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक, एअरस्ट्राईकव्दारे पाकिस्तानात घुसुन चोख उत्तर दिले. त्यामुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची जगात कुणाची हिंमत नाही. आपला देश अग्नि मिसाईलवाला देश बनला आहे. कोल्हापुरचा हुंकार दिल्लीत पोहचला पाहीजे. चारशे पारमध्ये कोल्हापुरचे दोन प्रतिनिधी पाहिजेत.

फडणवीस म्हणाले, विविध योजनांच्या माध्यमातून मोदी यांनी सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले. नव भारताची निर्मिती केली. भारतात कोरोनाने कोट्यवधी मृत्यू पावणार अशी जगाची धारणा होती. मात्र मोदींच्या नेतृत्वात शास्त्रज्ञांनी लस निर्माण करुन भारतीयांना जीवदान दिले. प्रत्येक समाजास प्रत्येक घटकास मोदींच्या नेतृत्वात मदत झाली. देशवासियांना जीवंत ठेवणार्‍या मोदींना मत द्यावे. कोल्हापुर श्रीरामाला मानणारे आहे. श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धैर्यशील माने, संजय मंडलिक यांच्या हातात धनुष्यबाण आहे. त्यामुळे धनुष्यबाणाला दिलेले मत, मंडलिक-माने यांना दिलेले मत म्हणजे विकसीत भारतासाठी मोदींना दिलेले मत आहे. मोदींनी गरीब कल्याणाचा अजेंडा ठरविला आहे. मोदी यांनी दीन-दलित, ओबीसी, अदिवासी, मराठा, धनगर, शेतकरी, शेतमजूर अशा सर्व समाजघटकांना मदत केली आहे.

Back to top button