परप्रांतीयाचा डोक्यात रॉड घालून खून | पुढारी

परप्रांतीयाचा डोक्यात रॉड घालून खून

हुपरी, पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी झालेला शाब्दिक वाद मनात ठेवून आपल्याच मित्राचा झोपेत असताना लोखंडी रॉडचा डोक्यात घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली. सुलेमान मुंतसरीब (वय 20, रा. फारिंदा पुलंदपूर महाराजगंज, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे.

खून करणार्‍या अल्पवयीन संशयिताला हुपरी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने भागात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन संशयित हा कोनिया (जि. महू, उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहे. तो खून करून उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. हुपरी पोलिसांनी त्याला कोल्हापूर येथील रेल्वेस्थानकावरून ताब्यात घेतले.

पट्टणकोडोली येथे विकास भवान यांच्या साईप्रसाद ट्रेडर्स येथे सुलेमान कामास होता. आठ दिवसांपूर्वी संशयित हादेखील येथे कामास आला होता. गोडाऊनमध्ये या दोघांचे वास्तव्य असायचे. दोन दिवसांपूर्वी दोघांत गोकुळ शिरगाव येथे वाहनातील माल उतरण्यावरून किरकोळ वादावादी झाली होती. मालक भवान यांनी दोघांना भांडू नका, असे बजावले होते.

शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे भवान हे गोडाऊनमध्ये आले असता, त्यांना दरवाजा उघडा दिसला. त्यांनी दोघांना हाका मारल्या, पण प्रतिसाद मिळाला नाही. आत जाऊन पाहताच त्यांना धक्का बसला. सुलेमान हा अंथरुणात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. संशथीय तेथे नव्हता. त्यांनी तत्काळ हुपरी पोलिसांना माहिती दिली. हुपरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निंगप्पा चौखंडे हे पथकासह घटनास्थळी दखल झाले. त्यांनी तत्काळ ठसे तज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले.

झोपेतच मित्राला यमसदनी पाठवून कोल्हापुर गाठले

दोघे रात्री जेवण करुन झोपले होते. शाब्दिक वाद झाल्याचा राग अल्पवयीन संशयीताच्या मनात सलत होता. सुलेमान झोपेत असल्याचे पाहून त्याने गोडाऊनमध्ये असणार्‍या लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात घाव घातले. त्यामुळे सुलेमान अंथरूणातच गतप्राण झाला. त्यानंतर संशयीताने तातडीने कोल्हापुर गाठले.

भावाला लावलेला फोन अन…

हुपरी पोलिसांनी खुनी अंकितकुमारच आहे हे हेरले. गोडाऊनमध्ये पोलिसांना रक्ताने माखलेली टॉमी (रॉड) मिळाली. त्यानी त्यादृष्टीने तपास सुरू केला. कॉल रेकॉर्ड तपासले असता त्याने कोल्हापुर रेल्वे स्थानकावरून भावाला पैशांसाठी फोन केल्याचे स्पष्ट झाले. लोकेशन मिळवून त्याचे छायाचित्र घेऊन पोलिस कोल्हापुरात दाखल झाले आणि रेल्वेस्थानकावर त्याच्या मुसक्या आवळल्या. चार तासातच हुपरीचे पोलिस निरिक्षक निंगप्पा चौखंडे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे, कॉन्स्टेबल प्रभाकर कांबळे, संदेश शेटे, अल्पेश पोटकुळे, विठ्ठल कोले आदींनी ही कारवाई केली.

बालाजी पिंपळगावकर हत्याकांड चर्चेत

2002 साली हुपरीत खंडणीसाठी बालाजी पिंपळगावकर या बालकाचे परप्रांतिय कामगारांनी अपहरण केले होते. त्याचा हुपरीतील शेतात खून करुन दोघे रेल्वेतून पळून जात असताना पोलीसांनी त्यांना जेरबंद केले होते. या घटनेतही परप्रांतीय कामगार खून करुन आपल्या गावी पळून जात असताना पोलिसांनी पकडले. या घटनेने बालाजी हत्याकांडाची घटना चर्चेत आली.

Back to top button