

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दिवसभराच्या उष्म्यानंतर बुधवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागाला वादळी पावसाने झोडपून काढले. वळिवडेत गॅलरीची काच पडून एका फळ विक्रेत्याचा मृत्यू झाला. जोरदार वार्याने शहरासह जिल्ह्यातही ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. जैन बोर्डिंगजवळ धावत्या दुचाकीवर झाड पडून एकजण गंभीर जखमी झाला. जवाहरनगर परिसरात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग शेजारील घरांवर कोसळला. काही भागांत झाडांवर वीज कोसळली. काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला. सुशील माधवदास रोहिडा (वय 34, रा. हरिओम प्लाझा, वळिवडे) असे मृत फळ विक्रेत्याचे नाव आहे.
वादळी वार्याने फ्लॅटच्या गॅलरीची काच सुशील याच्या अंगावर कोसळली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. सकाळपासूनच हवेत उष्मा होता. दुपारी तर अंगाची लाही लाही करणारा उन्हाचा तडाखा होता. उष्मा वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, दुपारनंतर काही भागात वातावरण ढगाळ झाले. जिल्ह्याच्या अनेक भागात दुपारीच सोसाट्याच्या वार्यासह पावसाला प्रारंभ झाला. शहराच्या पूर्वेकडील भागात सायंकाळी पाच वाजल्यापासून वार्यासह पावसाला सुरुवात झाली.
शहरात मात्र, सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून सोसाट्याचा वारा सुरू झाला. वार्याचा जोर इतका होता की, रस्त्यावरील कचर्याचे लोट हवेत फसरले होते. यामुळे काही अंतरावरीलही दिसत नव्हते. सायंकाळी सहाच्या सुमारास वीजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. काही काळ पावसाचा जोर होता. जोरदार पावसाने शहरातील सीपीआर चौक, परीख पूल, दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, लक्ष्मीपुरीतील जुन्या पुस्तकांच्या बाजार परिसरात पाणी साचले. पावसाने भाविक, पर्यटकांसह नागरिकांचीही तारांबळ उडाली. सायंकाळी झालेल्या पावसाने भाजी मंडईत विक्रेत्यांसह नागरिकांचीही त्रेधातिरपीट उडाली. वार्याने अनेक ठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स, फलक फाटले.
सीपीआर चौक ते जयंती नाला या मार्गावर जैन बोर्डिंगसमोर एक झाड जयंती नाल्याच्या दिशेने जाणार्या धावत्या दुचाकीवर पडले. झाड दुचाकीच्या मधोमध पडले, यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यामागे बसलेली तरुणीही जखमी झाली. या दोघांना नागरिकांनी सीपीआरमध्ये दाखल केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड हटवून पाऊण तास ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. जवाहरनगर येथील तुळजा भवानी मंदिर परिसरातील एका घरावर शेजारी सुरू असलेल्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील बांधकामाचा भाग कोसळला. सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, घरासह प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले.
शहरात परीख पूल, रेसिडेन्सी क्लब, आदित्य कॉर्नर, मुक्तसैनिक वसाहत, राजोपाध्येनगर या ठिकाणीही झाडे उन्मळून पडली. शाहू स्टेडियम, राजारामपुरी आदींसह ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या. रात्री उशिरापर्यंत ही झाडे, फांद्या हटवण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू होते.
वळीवडे, गांधीनगर, मुडशिंगी या परिसराला पावसाने चांगलेच झोडपले. मुडशिंगी येथे प्राथमिक शाळेचे पत्रे उडून गेले. इचलकरंजी शहरातही जोरदार पाऊस झाला. यळगुड, केंबळीमध्ये झाडांवर वीज कोसळली. पोर्ले तर्फे ठाणे, राशिवडे, सिद्धनेर्ली, गडहिंग्लज आदी ठिकाणीही पावसाने हजेरी लावली.
शहरासह जिल्ह्यातही अनेक भागात पाऊस सुरू होताच वीज गायब झाली. झाडे, फांद्या पडल्याने अनेक ठिकाणी वीजेच्या तारा तुटल्या. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.