करवीरनिवासिनी अंबाबाईचा आज रथोत्सव सोहळा | पुढारी

करवीरनिवासिनी अंबाबाईचा आज रथोत्सव सोहळा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनंतर कोल्हापुरात करवीरनिवासिनी अंबाबाई आणि शिवछत्रपती व ताराराणी यांच्या रथोत्सवाची परंपरा आहे. त्यानुसार जोतिबा यात्रेच्या दुसर्‍या दिवशी (बुधवार) अंबाबाईचा रथोत्सव होणार असून, तिसर्‍या दिवशी (गुरुवार) शिवछत्रपती व ताराराणी रथोत्सव होणार आहे.

जोतिबा यात्रेसाठी महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यांतून येणार्‍या लाखो भाविकांना छत्रपतींची राजधानी असणार्‍या कोल्हापूरच्या वैभवाचे दर्शन व्हावे, स्त्रीशक्तीचा सन्मान म्हणून करवीरनिवासिनी अंबाबाई आणि रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे शिवछत्रपती आणि त्या स्वराज्याचे रक्षण करणार्‍या रणरागिणी ताराराणी यांचा प्रेरणादायी इतिहास भावी पिढीला समजावा, या उद्देशाने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी या रथोत्सवाला राजाश्रयासह व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. यामुळे गेली शंभर वर्षे हा रथोत्सव व्यापक स्वरूपात साजरा केला जातो.

अंबाबाईच्या रथोत्सवाची जय्यत तयारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली आहे; तर शिवछत्रपती व ताराराणी यांच्या रथोत्सवाची तयारी करण्यात आली आहे. या रथोत्सवांसाठी शहरातील विविध पेठांमधील तालीम संस्था-संघटना, श्री महालक्ष्मी भक्त मंडळ धर्मशाळा, श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट, मावळा कोल्हापूर, सह्याद्री प्रतिष्ठान, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, अ. भा. मराठा महासंघ, न्यू गुजरी मित्र मंडळ, सराफ संघ यासह विविध संस्था-संघटनांची मोलाची साथ लाभत आहे.

मुस्लिम बांधवाची अनोखी सेवा

कोल्हापूरचा पुरोगामी वारसा व हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपत बाबासाहेब कासीम मुल्ला यांनी रथोत्सवासाठी अनोखी सेवा गेली 24 वर्षे अखंड सुरू ठेवली आहे. अंबाबाई आणि शिवछत्रपती-ताराराणी यांच्या रथोत्सवावर मुल्ला यांच्याकडून दरवर्षी पुष्पवृष्टी केली जाते. बालगोपाल तालीम मंडळ परिसरातील भोसले प्लाझा इमारतीवरून मुल्ला ही पुष्पवृष्टी करतात. आज वयाच्या 75 वर्षांतही ही सेवा त्यांनी कायम सुरू ठेवली आहे.

झुणका-भाकर उपक्रम

रथोत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे महाद्वार चौक ते जोतिबा रोड चौक मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई व नेत्रदीपक आतषबाजी करण्यात येणार आहे. याशिवाय श्री महालक्ष्मी भक्त मंडळ व श्री महालक्ष्मी अन्नछत्रतर्फे जोतिबा यात्रेकरूंसाठी मोफत झुणका-भाकर उपक्रम राबविण्यात येणार आहे. बुधवार, दि. 24 रोजी सकाळी 11 वाजता अंबाबाई मंदिर परिसरातील रामाचा पार येथे हा उपक्रम होईल. याचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी केले आहे.

Back to top button