निम्म्या कोल्हापुरात अर्धा तास धुवाँधार | पुढारी

निम्म्या कोल्हापुरात अर्धा तास धुवाँधार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शनिवारी दुपारी शहराच्या पूर्व भागात अर्ध्या तासाहून अधिक काळ धुवाँधार वळीव बरसला. सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर दुपारी पावसाने झोडपले. या पावसाने शहराच्या मध्यवर्ती भागासह पूर्वेकडील भागात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवर पाणी साचले. मात्र, याचवेळी निम्म्याहून अधिक शहर कोरडे ठाक होते.

गेल्या दोन दिवसांपासून शहराचा पारा 36 अंशांखाली आला आहे. आजही सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेत उकाडा अधिक होता. दुपारी पावणेतीनच्या सुमारास शहराच्या पूर्वेकडील भागात पावसाला सुरुवात झाली. काही काळ तर धुवाँधार सरी कोसळत होत्या. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची, प्रवासी, पर्यटक, भाविक यांची त्रेधातिरपीट उडाली.

व्हीनस कॉर्नर, स्टेशन रोड, मध्यवर्ती बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, ताराराणी चौक आदी परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे रस्त्यांवर पाणी साचले. काही ठिकाणी झाडांचा पाला पडल्याने रस्त्यावर चिखलसद़ृश स्थिती निर्माण झाली होती. बागल चौक ते बी. टी. कॉलेज रस्त्यावर चिखल झाला होता. ताराराणी चौकातही खोदकामामुळे साचलेले पाणी, चिखल यामुळे वाहनधारकांना काही काळ कसरत करावी लागत होती. अर्ध्या तासानंतर वातावरण पुन्हा निरभ्र झाले.

शहराच्या पूर्व भागात जोराचा पाऊस झाला असला तरी महाद्वार रोड, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ आदीपासून शहराच्या दक्षिण आणि पश्चिम भागात पावसाचा रात्री उशिरापर्यंत एकही थेंब पडला नाही.

आजही पावसाची शक्यता

दरम्यान, ढगाळ वातावरणाने शहरात शनिवारी कमाल 34 अंश इतके, तर किमान 25.3 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. रविवारीही काही भागांत दुपारनंतर पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Back to top button