कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा: कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी (दि. १९) अखेरचा दिवस आहे. या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान गुरुवारी कोल्हापूरसाठी १२ उमेदवारांनी १६ तर हातकणंगलेसाठी १४ उमेदवारांनी १७ अर्ज दाखल केले. शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील आणि महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार खा. संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनीही आज अर्ज दाखल केले.
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. शुक्रवार (दि. १९) अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस आहे. शनिवारी (दि. २०) दाखल उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. सोमवारी (दि. २२) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे.
दरम्यान, गुरुवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी बहुजन समाज पार्टीचे संदीप शिंदे यांनी एक, देश जनहित पार्टीचे संदीप कोगले यांनी पक्षाकडून दोन आणि अपक्ष दोन असे चार, अपनी प्रजाहित पार्टीचे संतोष बिसुरे यांनी एक, नॅशनल ब्लॅक पँथर पार्टीचे सुनील पाटील यांनी एक, भारतीय जवान किसान पार्टीचे बसगोंडा पाटील यांनी एक, तर अखिल भारतीय हिंदू महासभेचे शशिभूषण देसाई यांनी पक्षाकडून एक आणि अपक्ष एक असे दोन अर्ज दाखल केले. पुंडलिक बेनके, संदीप संकपाळ, कृष्णा देसाई, सलीम बागवान, राहुल लाड यांच्यासह महायुतीचे उमेदवार खा. संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद मंडलिक यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला.
हातकणंगले मतदारसंघातून भारतीय जवान किसान पार्टीचे रघुनाथ पाटील, वंचित बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील यांनी दोन, बहुजन समाज पार्टीचे रवींद्र कांबळे, कामगार किसान पार्टीचे संतोष खोत यांनी पार्टीकडून एक व अपक्ष एक, भारतीय लोकशक्ती पार्टीचे डॉ. ईश्वर यमगर, लोकराज्य जनता पार्टीचे धनाजी गुरव, बहुजन मुक्ती पार्टीचे इम्रान खतिव यांच्यासह देवेंद्र मोहिते, बाबासो पाटील, आनंदराव थोरात, वाळकृष्ण म्हेत्रे, जगन्नाथ भगवान मोरे, रामचंद्र साळुंखे यांनी प्रत्येकी एक तर मनोहर सातपुते यांनी अपक्ष म्हणून दोन अर्ज दाखल केले.