कोल्हापूर : बारा माजी महापौर आणि 105 नगरसेवकांचे पाठबळ : महाडिक | पुढारी

कोल्हापूर : बारा माजी महापौर आणि 105 नगरसेवकांचे पाठबळ : महाडिक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : बारा माजी महापौर आणि 105 माजी नगरसेवक यांचा पाठिंबा आणि प्रचारातील सक्रिय सहभागामुळे कोल्हापूर शहरात संजय मंडलिकांना मोठे पाठबळ मिळणार असून, मताधिक्य निश्चित मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

माजी नगरसेवकांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. शहराला विधानसभा निवडणुकीपूर्वी एक हजार कोटींचा विकास निधी मिळणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. खा. महाडिक म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने केलेली प्रचंड विकासात्मक कामे, समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांसाठी दिलेले भरीव योगदान याची माहिती घरोघरी पोहोचवा. विकासकामाचीच भली मोठी यादी असल्याने भावनिक मुद्द्याच्या पलीकडे जाऊन आपण बाजी मारणार आहोत.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, शहराला लोकसभेची आचारसंहिता संपल्यावर; पण विधानसभा निवडणुकीपूर्वीच एक हजार कोटी रुपयांचा विकास निधी देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या सविस्तर चर्चेत मान्य केले आहे. यामुळे पंचगंगा नदी प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय, उपनगरे वसाहतीमधील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी मोठी गती येणार आहे. यामुळे सर्व माजी नगरसेवकांनी झोकून देऊन प्रचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. खा. संजय मंडलिक म्हणाले, मुंबई-पुण्यानंतर सर्वाधिक जीएसटी देणारे कोल्हापूर शहर औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यटन, आध्यात्मिक, वैद्यकीय क्षेत्रासह विविध पैलूंनी विकसित होण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने प्रयत्नशील राहू.

Back to top button