कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला संभ—मातच ठेवले. ते जेव्हा आघाडीत येत नाही असे ठरले, तेव्हाच आम्ही उमेदवार दिला, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी लगावला.
हातकणंगले मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरूडकर यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिले. शाहू महाराजांनी रयतेची किती सेवा केली आहे हे करवीर नगरीला माहिती आहे, असे सांगत, महायुतीचे उमेदवार जाहीर करताना त्यांना किती त्रास होतोय हे आपय पाहतोय. एकूण परिस्थिती पाहता, ती परिस्थिती बरी नाही हे त्यांच्या ध्यानात आले आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांना आणखी बराच वेळ कोल्हापुरात यावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला.
'इस्लामपूर आणि बावडेकरांनी चाव्या फिरवल्या,' या शेट्टी यांच्या आरोपावर बोलताना पाटील म्हणाले, राजू शेट्टी यांनी दोन वेळेला उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. ते महाविकास आघाडीत येतील अशी शक्यता होती; मात्र त्यांनीच महाविकास आघाडीला संभ—मात ठेवले. ते जेव्हा येत नाहीत असे स्पष्ट झाले तेव्हाच आम्ही उमेदवार दिला. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनाही आम्ही एकत्रित लढण्याबाबतच सांगत होतो, असेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्या भूमिकेबाबत पाटील म्हणाले, हा काँग्रेसचा प्रश्न आहे. काँग्रेसने समजूत काढली तर बंडखोरीचा विषयच नाही. सांगलीची जागा राष्ट्रवादीने कधीही मागितलेली नव्हती. चर्चेने, सामोपचाराने निर्णय घेऊन ही जागा शिवसेनेला देण्यात आली. त्यानुसार शिवसेनेने नवा चेहरा म्हणून चंद्रहार पाटील यांना उमेदवारीही दिली आहे. एकच उमेदवार असावा, अशी अपेक्षा आहे. यामुळे एकत्रित बसून याबाबत चांगला निर्णय होईल, असा विश्वास असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग, साताराच्या जागांबाबत भाजपच्या मनात आत्मविश्वास नाही. नाहीतर उमेदवारीला इतका उशीर का लावला? छत्रपतींच्या वंशज असलेल्या उदयनराजे यांनाही उमेदवारीसाठी तिष्ठत ठेवले. उमेदवारी द्यायची की नाही, असा संभ—म होता, असेही पाटील म्हणाले. 'अबकी बार चारसो पार' चा नारा दिला जातो, ही फार गोष्ट आहे. 200 पार करताना नाकीनऊ येईल, असेही पाटील म्हणाले.