जोरदार शक्तिप्रदर्शनाने शाहू महाराज यांचा उमेदवारी अर्ज | पुढारी

जोरदार शक्तिप्रदर्शनाने शाहू महाराज यांचा उमेदवारी अर्ज

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांनी मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. रणरणत्या उन्हातही शाहू महाराज यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रस्त्यावर जनसागर उसळला होता. उत्स्फूर्तपणे नागरिक रॅलीत सहभागी झाले होते. आघाडीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाल्यामुळे रॅलीचा मार्ग विविधरंगी झाला होता. हालगी, घुमक्याच्या तालावर महिलांसह ठेका धरणार्‍या कार्यकर्त्यांमुळे रॅलीतील उत्साह शेवटपर्यंत टिकून होता.

लोकसभा निवडणुकीचे महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत भरण्यात आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आजच्या रॅलीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. गेल्या आठ दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते रॅलीचे नियोजन करत होते. सकाळपासून कार्यकर्ते ऐतिहासिक दसरा चौकामध्ये जमत होते. गटागटाने कार्यकर्ते तसेच नागरिक मिळेल त्या वाहनाने दसरा चौकाकडे येत होते. रॅलीस सुरुवात होण्यापूर्वी कार्यकर्ते गर्दीसह फोटो काढत होते. सकाळी अकराच्या सुमारास मालोजीराजे दसरा चौकात आले. त्यानंतर काही मिनिटांतच आमदार सतेज पाटील दसरा चौकामध्ये दाखल झाले. त्यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत टायटन शोरुमकडून दसरा चौकापर्यंत वाजत-गाजत आणले. यावेळी तरुणांच्या उत्साहामुळे रॅलीमध्ये एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले. गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे यांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतले. यावेळी सतेज पाटील हातात तिरंगा घेऊन फिरवत होते. दसरा चौक गर्दीने ओसंडून वाहू लागल्यानंतर फुलांनी सजविलेले वाहन दसरा चौकामध्ये मिरवणूक सुरू करण्यासाठी उभे करण्यात आले. तालमीतील पैलवान फेटे बांधून रॅलीत सहभागी झाले होते.

सव्वाअकराच्या सुमारास शाहू महाराज आल्यानतंर सर्व नेते या वाहनामध्ये उभे राहिले. यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार जयंत आसगावकर, आ. ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, सरोज (माई) पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, विजय देवणे, ए. वाय. पाटील, राहुल पाटील, मधुरिमाराजे, आर. के. पोवार, विद्या चव्हाण, संजय घाटगे, संजय पवार आदी उपस्थित होते.

रॅली सुरू होईपर्यंत अखंडपणे शाहू महाराज यांच्यावर तयार केलेल गीत डॉल्बीवर लावण्यात आले होते. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मुस्लिम बोर्डिंग येथे नागरिकांसाठी सरबतची व्यवस्था करण्यात आली होती. दसरा चौकामध्ये दोन सावलीसाठी दोन मंडप घालण्यात आले होते. नेते आल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी कार्यकर्ते गर्दी करत होते. सव्वाअकराच्या सुमारास रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना ठाकरे गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, जनता दल, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आपापले झेंडे घेऊन रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे रॅलीत रंगीबेरंगी चित्र निर्माण झाले होते. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली नेण्यात आली. रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली तरी नागरिक रॅलीमध्ये सहभागी होतच होते. झेंड्यांबरोबर कार्यकर्त्यांच्या हातामध्ये फलकही होते.

यावेळी सचिन चव्हाण, सुनील मोदी, रविकिरण इंगवले, सुनील शिंत्रे क्रांती पवार-पाटील, बाबासोा देवकर, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, सरलाताई पाटील, बाळ पाटणकर, गोपाळराव पाटील, स्वाती कोरे, डॉ. नंदाताई बाभूळकर, दगडू भास्कर, माजी महापौर अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, कॉ. अतुल दिघे, कॉ. चंद्रकांत यादव, बबनराव रानगे, गणी आजरेकर, कादर मलबारी, विश्वास नारायण पाटील, सुरेश साळोखे, राहुल पाटील, रामराजे कुपेकर, वसंतराव मुळीक, संदीप देसाई, दयानंद कांबळे आदी रॅलीत सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅली थांबविण्यात आल्यानंतर शाहू महाराज यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सरोज (माई) पाटील, माजी आमदार संजय घाटगे, कॉम—ेड दिलीप पवार आदी उपस्थित होते. शाहू महाराज यांनी तीन उमेदवारी अर्ज भरले.

केएमटी बसमधून प्रचार

मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते अशोक पोवार तसेच रमेश मोरे यांनी रॅलीला येताना केएमटी बसमधून प्रवास केला. तसेच बसमधील प्रवाशांना कोल्हापूरचे शाहू महाराजांना मतदान करण्याचे आवाहन केले. शाहूंचा समतेचा विचार दिल्लीत पोहोचविण्यासाठी शाहू महाराजांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांनी केले. उपस्थित प्रवाशांनीही त्यांना साथ दिली.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

उन्हाचे चटके सहन करत लोक शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. आलेल्या लोकांसाठी मानसिंग बोंद्रे फौंडेशन, मुस्लिम बोर्डिंग, गणी आजरेकर फौंडेशनच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. प्रचार रॅलीत आलेल्या प्रत्येकाला पाणी देण्यासाठी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी व्यवस्था केली होती.

माणुसकीचे दर्शन; रुग्णवाहिकेला करून दिली वाट

या प्रचार रॅलीमध्ये हजारो नागरिक सहभागी होते. जिल्हाधिकारी कार्यालय ते दसरा चौक या मार्गावर मोठी गर्दी होती. या गर्दीतून सायरन वाजवत एक रुग्णवाहिका सीपीआरच्या दिशेने जात होती. त्याचवेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी माणुसकी दाखवत या रुग्णवाहिकेला वाट करून दिली.

सतेज पाटील, अंबरिश घाटगे यांनी झेंडे फिरविले

दसरा चौकात आमदार सतेज पाटील येताच कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी त्यांच्यासोबत गोकुळचे संचालक अमरिश घाटगेही उपस्थित होते. यावेळी सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांनी अक्षरश: खांद्यावर घेऊन नाचायला सुरवात केली. यावेळी सतेज पाटील यांनी देखील काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेत तो फिरविला. र गोकुळचे संचालक अमरिश घाटगे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मशाल चिन्ह असलेला झेंडा हातात घेउन फिरवला. यावेळी मोठा उत्साह निर्माण झाला.

दसरा चौकात अलोट गर्दी

राजर्षी छत्रपती शाहूंचा समतेचा विचार दिल्लीच्या संसदेत घुमविण्यासाठी विद्यमान शाहू महाराज लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्या विजयासाठी रॅलीत सहभागी व्हा, असे आवाहन गेल्या दोन दिवसापासून करण्यात येत होते. त्यामुळे या रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला. रॅलीचे एक टोक दसरा चौकात तर दुसरे टोक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ होते.

Back to top button