KDCC Bank Election : कोल्हापूर जिल्हा बँकेत राधानगरीत ‘हाता’वर बांधले ‘घड्याळ’ | पुढारी

KDCC Bank Election : कोल्हापूर जिल्हा बँकेत राधानगरीत ‘हाता’वर बांधले ‘घड्याळ’

राशिवडे : प्रवीण ढोणे KDCC Bank Election : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी आप – आपसांतील राजकीय मतभेेेद बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतल्याने राधानगरी तालुक्यातून सेवासंस्था गटातून विद्यमान संचालक ए. वाय. पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सध्या तरी सुकर झाला आहे.

पालकमंत्री सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना तशा सूचनाही दिल्या आहेत. बँकेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आगामी जि. प., पं. स. आणि भोगावती कारखान्याच्या निवडणुकीसाठी नवी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता आहे.

KDCC Bank Election : ए. वाय. पाटील यांना राजकीय शह देण्याची तयारी

महिन्यापूर्वी राधानगरी तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते आणि मतदारांनी अनेक बैठका घेऊन ए. वाय. पाटील यांच्या विरोधात निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते.

राष्ट्रवादीच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेससह आ. आबिटकर गट, शेका पक्ष, जनता दल, माजी आमदार के. पी. पाटील गट आणि राष्ट्रवादीतील नाराज मंडळींना एकत्रित करून ए. वाय. पाटील यांना राजकीय शह देण्याची तयारीही सुरू केली होती.

त्यानुसार तोडीस तोड म्हणून तालुक्यातून सर्व पक्षीय, सर्वमान्य उमेदवार म्हणून ‘भोगावती’चे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वनाथ पाटील यांची उमेदवारीही भोगावती येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आली होती.

आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेती संस्था गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार ए. वाय. पाटील यांना मदत करण्याचा निर्णय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतला असल्याचे सांगण्यात आले.

या निर्णयामुळे आता ए. वाय. यांच्या बिनविरोधचा मार्गच सुकर झाला असून आगामी भोगावती कारखाना, जि. प., पं. स. निवडणुकीपर्यंत ही एकीची महाआघाडी टिकणार काय, हा प्रश्न सध्या नव्याने निर्माण झाला आहे.

प्रमुख काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांची गोची

भोगावती कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांनी राधानगरीतील काँग्रेसच्या मंडळींना आपण जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत ठामपणे राहणार असल्याचे स्पष्ट

केले आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांची राजकीय गोची निर्माण झाली आहे.

या कडक सूचनेनंतर काँग्रेस नेत्यांच्या हालचाली थांबल्या आहेत.

Back to top button