मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची सोमवारी निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. शिंदे यांनी विविध विषयांवर डॉ. जाधव यांच्याशी दीड तास चर्चा केली. यावेळी महायुतीचे जिल्ह्यातील सर्व नेते उपस्थित होते.

महायुतीचे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांतील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सोमवारी कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता मुख्यमंत्री शिंदे नागाळा पार्क येथील डॉ. जाधव यांच्या निवासस्थानी आले.

शिंदे यांनी डॉ. जाधव यांच्याशी राज्यातील सर्वच मतदारसंघांची सविस्तर चर्चा केली. सध्याची जिल्ह्यातील राजकीय स्थिती, राज्य व देशभरातील निवडणूक आणि राजकीय स्थिती, वेगवेगळ्या ठिकाणी परिणामकारक व हानिकारक ठरणारे घटक, वेगवेगळ्या मतदारसंघांतील राजकीय समीकरणे, मतदारसंघांतील विविध प्रश्न आदी विषयांवर शिंदे यांनी डॉ. जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा करत माहिती घेतली. सुमारे दीड तास ही चर्चा सुरू होती.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, खा. धनंजय महाडिक, आ. प्रकाश आवाडे, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. प्रकाश आबिटकर, भाजपाचे नेते, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, जनसुराज्य शक्तीचे समित कदम, माजी मंत्री रामदास कदम, विजय शिवतारे, भरमू पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजय चव्हाण, रवी माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदींसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news