शक्तिप्रदर्शन करत राजू शेट्टींची उमेदवारी दाखल | पुढारी

शक्तिप्रदर्शन करत राजू शेट्टींची उमेदवारी दाखल

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत बैलगाडीने येऊन सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शेट्टी यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन दिवसांत जी तत्परता दाखविली, तेवढी तत्परता गतवर्षी कारखानदारांना मिळालेल्या जादा रकमेतून 100 रुपये शेतकर्‍यांना देण्यासाठी दाखविली असती तर कदाचित उमेदवारी अर्ज भरताना मला विचार करावा लागला असता, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

राजू शेट्टींनी स्वतंत्रपणे लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे या रॅलीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सकाळी दहा
वाजल्यपासून शेतकरी दसरा चौकात जमत होते. याठिकाणी टॅक्टरवर स्टेज करण्यात आले होते. ऊन वाढत होते तशी दसरा चौकातील गर्दी वाढत होती. महिलांची उपस्थिती देखील यावेळी लक्षणिय होती. मैदानावर हलगी, घुमक्याच्या तालावर शेतकरी नाचत होते, एकच गट्टी, राजू शेट्टी घोषणा सतत सुरू होती. डोक्यावर स्वाभिमानी लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राजू शेट्टी यांचे दसरा चौकामध्ये आगमन झाले.

पावणे दोन वाजण्याच्या सुमारास रॅलीला सुरुवात झाली. भर उन्हात निघालेल्या रॅलीत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांचा उत्साह ओसांडून वाहत होता. दसरा चौका, व्हिनस कॉर्नर, बसंत बहार रोड मार्गे रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. शंभर मिटरवर कार्यकर्त्यांना अडविण्यात आले. परंतू कार्यकर्ते आत जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करत त्यांना रोखावे लागले. रॅलीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचल्यानंतर शेवटचे टोक व्हिनस कॉर्नरपर्यंत होते. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प राहिली. त्याचा परिणाम शहरातील आजुबाजुच्या मार्गावरील वाहतुकीवर देखील पडला.

पावणे तीन वाजण्याच्या सुमारास शेट्टी यांनी राष्ट्रीय किसान मोर्चाचे व्ही. एन. सिंग यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत विद्यार्थीन प्रज्ञा घाटगे, कामगार बाळासाहे कारंडे, शेतमजूर बाळासाहेब कांबळे, गिरणी कामगार गजानन आंबी प्रतिनिधी म्हणून होते.

अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलतांना शेट्टी म्हणाले, शक्ती प्रदर्शन केले नाही. कारण नसताना काही लोकांनी मी एकटा पडलोय अशी हवा केली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी आले होते. बैलगाडीतून साधेपणाने अर्ज भरला. कोणी काही दावे करो, घोड मैदान लांब नाही, सामान्य जनतेच्या मनात काय आहे हे चार जून रोजी समजेल.

आवाडेंचा आत्मसन्मान मुंबईहून आणला असावा

आवाडेंच्या माघारीवर मी काय बोलणार त्यावरअधिक मप्रकाशफ आवाडेच टाकू शकतील. काही तरी ठरले असेल. त्यांचा आत्मसन्मान, स्वाभिमान मुख्यमंत्री शिंदे बहुतेक मुंबईहून घेऊन आले असावेत, असा अंदाज आहे. असे सांगून शेट्टी यांना सदाभाऊ खोत यांनी केलेल्या आरोपाबद्दल विचारले असता त्यांनी भामट्यांच्या आरोपांवर मी प्रतिक्रिया देत नाही, असे म्हणाले.

तर त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात लढण्याची हिम्मत झाली नसती

गेल्या दोन दिवसापासून मुख्यमंत्री जेवढी धडपड करत आहेत, तेवढी धडपड धडपड त्यांनी नोव्हेंबरमध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे ऊस उत्पादकांचे 100 रुपये देण्याची कार्यवाही केली असती तर कदाचित मला मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारांच्या विरोधात लढण्याची हिम्मत झाली नसती. असेही शेट्टी म्हणाले.

Back to top button