लाेण्यावरील बाेके : रुबाब मारण्यासाठी दूध संस्थांचा वापर; कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार, बळीराजा बेदखल

लाेण्यावरील बाेके : रुबाब मारण्यासाठी दूध संस्थांचा वापर; कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार, बळीराजा बेदखल

कोल्हापूर : ऊन, वारा, पाऊस, थंडी, वादळ का हीही असो, घरातील स्त्रिया जनावरांच्या धारा काढणे आणि पुरुष मंडळी जनावरांना चारा आणण्याकरिता शेतात राबून घाम गाळतात. 10 दिवसाला मिळणारे दूध बिल आणि दिवाळीच्या वेळी दर फरक एवढे मिळाले की, दूध संस्था चांगली चालली आहे असे समजले जाते; पण गेल्या दहा ते बारा वर्षांत जिल्ह्यातील अनेक दूध संस्थांमध्ये दूध बिले हडप करणे, दर फरक न देणे, ऑडिट करून न घेणे असे प्रकार घडत आहेत. याच्या तक्रारी दुग्ध उपनिबंधकांकडे दाखल होत आहेत. मग त्यावर तक्रारी, दावे-प्रतिदावे दाखल करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.

संस्थेच्या जीवावर रुबाब मारण्यासाठी आणि गावातील राजकारणावर वचक ठेवण्यासाठी संस्थांचा वापर करण्याचे प्रकार वाढत आहेत. दुग्ध विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी याबाबींकडे गांभीर्याने लक्ष देत, उत्पादकांच्या एकाही रुपयाचा गैरकारभार झाला नसला पाहिजे, अशी सक्त सूचना लेखा विभागाला दिली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक दूध संस्थेतील गैरव्यहार बाहेर पडत आहेत. यावरून जिल्ह्यातील दूध संस्थांमध्ये कुंपनानेच शेत खाण्याचा प्रकार घडत आहे.

जिल्ह्यात 5500 सहकारी दूध संस्था आहेत. जिल्ह्यात दूध संस्थामार्फत केले जाणारे एका दिवसाचे संकलन सुमारे 16 ते 18 लाख लिटर्स आहे. सरासरी एका दिवसाची दुध खरेदीची उलाढाल सुमारे 8 ते 10 कोटी होत आहे.

संस्था चालकांचा खरा खेळ संस्थेच्या दूध विक्रीमधून झालेल्या नफ्यावर चालतो. दूध विक्रीतून बोगस अ‍ॅडव्हान्स वाटप, बोगस खर्च, दुध खरेदी मध्ये वाढ करणे, दुध विक्रीची रक्कम जमा न घेणे, हात शिल्लक कमी करणे अशा गोष्टी करून दुध उत्पादकांच्या पैशाची लुट केली जाते. पण दुधावर पोसलेल्या बोक्यांना ना सरकारची ना अधिकार्‍यांची भिती वाटत नसल्याचे चित्र आहे. जिल्हयातील दुध संस्था, सहकार टिकवायचा असेल तर संस्थेची आर्थिक नाडीचे योग्य पध्दतीने परिक्षण होणे गरजेचे आहे. तरच दूध उत्पादकांना न्याय मिळेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news