रात्र जागवत मुख्यमंत्र्यांनी लावल्या जोडण्या | पुढारी

रात्र जागवत मुख्यमंत्र्यांनी लावल्या जोडण्या

विकास कांबळे

कोल्हापूर : निवडणुका म्हटल्या की, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिवस कधी सुरू होतो आणि रात्र कधी संपते, हेच कळत नाही. नेत्यांना तर क्षणभरही उसंत मिळत नाही. मतदारसंघातील रुसवे फुगवे काढण्यासाठी आणि जोडण्या लावण्यासाठी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे नेते पळत असतात. त्याचा अनुभव शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍यात आला. जिल्ह्यातील आपल्या दोन्ही उमेदवारांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी रात्री साडेदहापासून जोडण्या व नाराजी दूर करण्यासाठी रविवारची रात्र अक्षरश: जागविली आणि पहाटे 5 वाजून 50 मिनिटांनी ते मुंबईला रवाना झाले.

लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्ह्यातील हातकणंगले व कोल्हापूर या दोन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. हातकणंगलेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली असताना भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनी बंडखोरी करण्याची भूमिका घेतल्यामुळे महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री शिंदे कोल्हापूरच्या दौर्‍यात आवाडे यांची समजूत घालण्यात यशस्वी होतील, अशी अपेक्षा असताना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बाहेर आल्यानंतर आ. आवाडे यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगून लोकसभेच्या आखाड्यात उतरणारच असल्याचे स्पष्ट केले.

शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांचे कोल्हापुरात आगमन झाले. भेटीगाठी सुरू झाल्या. सुमारे पाच ते साडेपाच तास दोन्ही मतदारसंघांचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर ते जाहीर कार्यक्रमांना बाहेर पडले. रात्री दहाच्या सुमारास ते मुंबईला रवाना होणार होते; परंतु हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जोडण्या लावण्यासाठी त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या.

रात्री दहाच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विनय कोरे यांच्याकडे वारणानगरला गेले. या ठिकाणी सुमारे दीड ते दोन तास दोघांमध्ये चर्चा झाली. रात्री पाऊण वाजता माले येथील शिवसेनेचे सचिव ओमकार चौगले यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री पोहोचले. येथे थोडा वेळ थांबून ते जयसिंगपूरला रवाना झाले. मध्यरात्री तीनच्या सुमारास ते आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निवासस्थानी गेले.

या दोघांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. तेथून ते कोल्हापूर विमानतळावर पोहोचले. अशा पद्धतीने संपूर्ण रात्र जागवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी पावणेसहाच्या सुमारास मुंबईकडे रवाना झाले. त्यांच्या या रात्रीच्या जोडण्यांमुळे पोलिसांनादेखील रात्रभर मार्गावर पहारा ठेवावा लागला.

रात्रीचा दिवस…

रात्री 10.30 वाजता वारणानगरकडे रवाना
रात्री 12 वाजेपर्यंत विनय कोरे यांच्याशी चर्चा
रात्री 12.30 वाजता माले (पन्हाळा) येथे ओमकार चौगले व कार्यकर्त्यांसमवेत चर्चा
रात्री 1 वाजून 20 मिनिटांनी कणेरीमठाकडे रवाना

रात्री 2.30 वाजेपर्यंत कणेरीमठ
पहाटे 2.30 वजता जयसिंगपूरकडे रवाना
रात्री 3 वाजता आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निवासस्थानी पहाटे 5 वाजेपर्यंत चर्चा
सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी कोल्हापूरहून मुंबईला रवाना

Back to top button