कोल्हापूर : कुंभारवाडीमध्ये सलग दोन रात्री बिबट्याचा मानवी वस्तीत वावर | पुढारी

कोल्हापूर : कुंभारवाडीमध्ये सलग दोन रात्री बिबट्याचा मानवी वस्तीत वावर

कळे: पुढारी वृत्तसेवा :  पन्हाळा तालुक्यातील कुंभारवाडी येथे गेल्या दोन दिवसांपासून मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा रात्री वावर असून शनिवारी (दि.१३) पहाटे जनावरांच्या गोठ्यातील गायीच्या वासराचा फडशा पाडला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दोन दिवसांपासून वनविभागाने जागोजागी ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे व रेस्क्यू टीमने ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे शोधमोहीम राबविली आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी वारनूळ येथे जंगल परिसर व शिवारात बिबट्या दिसल्याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभाग बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. शनिवारी (दि.१३) पहाटे कुंभारवाडी येथील मध्यवस्तीलगत असणाऱ्या निवृत्ती भिकाजी भवड यांच्या घराच्या मागील बाजूस असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यातील गायीच्या वासरावर (कालवड) बिबट्याने हल्ला करुन त्याला जवळच असणाऱ्या शेतात नेवून त्याचा फडशा पाडला. दुसऱ्या दिवशी वासराच्या शरीराचा अर्धवट भाग शेतामध्ये आढळून आला होता. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

दरम्यान, शनिवारी सकाळी ग्रामस्थांनी याबाबत वन विभागाला कळविले. याठिकाणी वनपाल एन.एस.पाटील, वनरक्षक एस.व्ही.काशिद व वनमजूरांनी पंचनामा करुन शिवारात शोधमोहीम राबविली. वनविभागाने वासराच्या अर्धवट शरीर पडलेल्या ठिकाणी दोन ट्रॅप कॅमेरे लावले. याठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. तसेच ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये शनिवारी रात्री साडेनऊ व साडेदहा वाजता बिबट्या मृत वासरु ओढून नेत असल्याचे दिसले.

दरम्यान रविवारी (दि.१४) वन विभागाने घटनास्थळी तळ ठोकून शोधमोहीम गतिमान केली. ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्या वाढवून रात्री वन विभागाच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले. सायंकाळी सात वाजल्यानंतर ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम गतिमान केली. बिबट्याने जनावरावर केलेल्या हल्ल्यामुळे कुंभारवाडीसह वारनूळ, काटेभोगाव, माजनाळ व कळे परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीदायक वातावरण पसरले असून वन विभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा 

Back to top button