कोल्हापूर : अंबाबाई मूर्ती संवर्धन आजपासून | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाई मूर्ती संवर्धन आजपासून

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : करवीर निवासिनी अंबाबाई मूर्ती सुस्थितीत राहावी या उद्देशाने भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीनुसार मूर्ती संवर्धन प्रक्रिया रविवारी (दि. 14) व सोमवारी राबविण्यात येणार आहे. या कालावधीत गाभारागृह दर्शनासाठी बंद राहणार असल्याने उत्सवमूर्ती व कलश पितळी उंबर्‍याच्या बाहेर ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी याचे दर्शन घेण्याचे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन उपलब्ध अद्ययावत तंत्राद्वारे योग्य पद्धतीने व्हावे या मागणीचे निवेदन प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पुरातत्त्व विभाग, देवस्थान समिती, जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनासह संबंधित विभागांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, मूर्तीची झालेली झीज रोखण्यासाठी 2015 व 2021 मध्ये मूर्तीचे संवर्धन करण्यात आले. या संवर्धनावेळी अनेक अनुचित बाबी निदर्शनास आल्या. त्यावेळी काही चुका झाल्याचे अहवालातून समजले. गत संवर्धनासाठी वापरलेले पदार्थ हे मूळ मूर्तीच्या पाषाणाशी न जुळल्यामुळे अनेक ठिकाणी तडे गेल्याचे व झीज झाल्याचे अहवालात नमूद आहे. आत्ता करण्यात येणारे संवर्धन हे योग्य पदार्थाचा वापर करून होणे आवश्यक आहे.

अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येईल

मूर्तीचे संवर्धन केवळ दोन दिवसांत होणार आहे ही आश्चर्यकारक बाब आहे. ही प्रक्रिया इतकी साधी आणि सोपी असेल तर ती राबविण्यात इतका विलंब का केला, असा सवालही त्यांनी व्यक्त केला आहे. घाईगडबडीत आणि अयोग्य पद्धतीने पुन्हा संवर्धनाचे काम होऊ नये. तसे घडल्यास संबंधित सर्व अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देसाई यांनी निवेदनातून दिला आहे.

Back to top button