आताचे शाहू महाराज खरे वासरदार नाहीत; दत्तकच आले आहेत : खा. संजय मंडलिक | पुढारी

आताचे शाहू महाराज खरे वासरदार नाहीत; दत्तकच आले आहेत : खा. संजय मंडलिक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आताचे शाहू महाराज खरे वारसदार नाहीत. ते कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तकच आले आहेत. त्यामुळे राजर्षी शाहू महाराज यांचे खरे वारसदार तुम्ही-आम्ही आहोत, असे वक्तव्य महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी केले.

काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते आ. सतेज पाटील आणि खा. मंडलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात आता थेट शाहू महाराज यांच्यावरच मंडलिक यांनी टीकास्त्र सोडले आहे.

बुधवारी नेसरी येथे झालेल्या प्रचार सभेत खा. मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्यावर टीका केली. माझे वडील कै. सदाशिवराव मंडलिक यांनी खर्‍या अर्थाने पुरोगामी विचार जपला. आखाड्यात उतरल्यानंतर विरोधी मल्लाला हातच लावायचा नाही. त्या मल्लाला टांगच मारायची नाही. मग कुस्ती तरी कशी होणार? अशी विचारणा करत मंडलिक यांनी विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते कोल्हापूरमध्ये दत्तकच आले आहेत, ते खरे वारसदार नाहीत, अशी टीका केली. मंडलिक यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.

कांगावाखोरांनी दत्तक वारस विरोधाचा इतिहास जाणून घ्यावा : मंडलिक

कोल्हापूर : काही कांगावाखोरांनी माझ्या वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास चालू केला आहे. हे वक्तव्य कोल्हापूरची गादी अथवा लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी नाही. विद्यमान शाहू महाराज हे दत्तक आलेले आहेत. हे वास्तव असूनही माझ्या विरोधात काही विषय मिळत नसल्याने काहीनी कांगावा सुरू केला आहे. त्यांनी कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने 1962 मध्ये दत्तक वारस विरोधाला केलेल्या व्यापक जनआंदोलनाचा इतिहास आधी जाणून घ्यावा, असे पत्रक खा. मंडलिक यांनी काढले आहे.

पत्रकात म्हटले आहे, नेसरी येथे प्रचार सभेत मी आताचे शाहू महाराज दत्तक वारसच आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारसदार कोल्हापूरची जनताच आहे आणि ही वस्तुस्थिती आहे, असे स्पष्टपणे म्हटले आहे. मात्र, त्याचे राजकीय भांडवल करून स्टंटबाजी करत आपली पोळी भाजून घेऊ नये. राजर्षी शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आम्ही 60 वर्षांपासून जगत आहोत. काल-परवा राजकारणात आलेल्यांनी जनतेची दिशाभूल करू नये. मी जे विधान केले ते वास्तव आहे. कोल्हापूरचा स्वाभिमान दुखावल्याचा कांगावा करणार्‍या सतेज पाटील यांनी माहीत करून घ्यावे की, आताच्या शाहू महाराजांना दत्तक घेताना जनतेने त्यांना प्रचंड विरोध केला होता, असेही मंडलिक म्हणाले.

दत्तक आहेत की नाही, हे शाहू महाराज यांनीच सांगावे; माफी मागणार नाही : खा. मंडलिक

बोलताना एक शब्द चुकलो. आताचे शाहू महाराज हे थेट वारसदार नाहीत, दत्तक वारसदार आहेत, असं मला म्हणायचे होते. शाहू महाराज दत्तक आहेत. थेट वारसदार नाहीत. दत्तक आहेत की नाही हे त्यांनीच सांगावे, असा प्रतिसवाल करत माफी मागणार नाही, असे खा. मंडलिक यांनी विरोधकांना ठणकावले. शाहू महाराजांचा अपमान केला नाही, माफी कशाबद्दल मागावी, असा सवाल मंडलिक यांनी भाजप पदाधिकारी मेळाव्यात केला.

Back to top button