

जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : कुपवाड (जि. सांगली) येथील दत्ता पाटोळे या तरुणाच्या खुनातील संशयित आरोपी सचिन चव्हाण (वय 24, मूळ गाव रा. मु. बसाप्पाचीवाडी पो. कोकळे, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली, सध्या रा. शाहूनगर, जयसिंगपूर) याचा पाठलाग करून धारदार हत्याराने भर दुपारी खून केल्याचा थरारक प्रकार उदगाव (ता. शिरोळ) येथे महामार्गावर गुरुवारी घडला. मारेकर्यांनी अत्यंत निर्घृणपणे सपासप वार केल्याने सचिनच्या दोन्ही हाताची मनगटे छाटली गेली. अंगावर शहारे आणणार्या या हत्याकांडामुळे उदगाव पार हादरून गेले आहे.
निर्भया पथकाच्या सतर्कतेमुळे या खून प्रकरणातील संशयित साहिल अस्लम समलीवाले (26, रा. वाघमोडेनगर, कुपवाड) व परशुराम हणमंत बजंत्री (25, रा. आलिशाननगर, कुपवाड) यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती जयसिंगपूर विभागाच्या पोलिस उपअधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके यांनी पत्रकारांना दिली.
कुपवाड येथे 2020 मध्ये दत्ता पाटोळे या तरुणाचा खून झाला होता. या खुनाच्या आरोपाखाली सचिन चव्हाण याला अटक करण्यात आली होती. महिन्याभरापूर्वी तो जामिनावर सुटून आला होता. त्याचे आई, वडील, भाऊ हे तिघेजण जयसिंगपूर येथील सुदर्शन चौक येथे वास्तव्यास आले आहेत. गुरुवारी सचिन हा जयसिंगपूरहून सांगली येथे मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. तेव्हापासून संशयित सचिनच्या मागावर होते.
दुपारी दुचाकीवरून सचिन सांगलीहून जयसिंगपूरकडे येत असताना उदगाव येथील पेट्रोल पंपासमोर संशयितांनी त्याला गाठले आणि सचिन यांची दुचाकी रस्त्यावर पडली. याचवेळी संशयितांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वत:चा बचाव करण्यासाठी तो भीतीने पळत सुटला. शेजारी असणार्या रावसाहेब जालिहाळ यांच्या फॅबि—केशन दुकानात तो गेला. त्यानंतर दुकानाच्या आतमध्ये असणार्या घरात तो शिरला. त्याच्या पाठीमागून संशयित देखील आतमध्ये घुसले. तेथे सचिनवर सपासप वार करण्यात आले. घरातून सचिन पुन्हा दुकानात आला. याठिकाणी त्याच्यावर पुन्हा वार करण्यात आले. यावेळी हाताची दोन्ही मनगटे तुटून पडली होती. डोक्यातही गंभीर वार झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडून तो जागीच ठार झाला.
घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक रोहिणी सोळंके, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी पाहणी करून पंचनामा केला. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्याचबरोबर सांगली-कोल्हापूर महामार्गावर वाहनांची गर्दी झाली होती. शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
घातक शस्त्रासह मारेकरी पकडले
सचिनचा खून करून संशयित घटनास्थळावरून पळून जात होते. दरम्यान पेट्रोलिंग करणार्या निर्भया पथकाने पाठलाग केला असता उदगाव येथील टेक्निकल हायस्कूल असणार्या रिकाम्या जागेत दोघे संशयित हातात हत्यार घेऊन एका बंद खोक्याच्या पाठीमागे लपून बसल्याचे निदर्शनास आले. यावेळी निर्भया पथकातील पोलिस उपनिरीक्षक भरत पाटील, पोलिस कर्मचारी शैलेश पाटील, अमित मोरे, विक्रम मोरे यांनी संशयितांना हत्यारांसह ताब्यात घेतले.