एका व्यासपीठावर या, काय केले ते सांगतो : संभाजीराजे | पुढारी

एका व्यासपीठावर या, काय केले ते सांगतो : संभाजीराजे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : खासदारकीच्या काळात मी काय केले, हे विचारणार्‍यांनी एका व्यासपीठावर यावे, आपण सांगण्यास तयार आहोत, असे माजी खासदार संभाजीराजे यांनी विरोधकांना सुनावले.

महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ नेसरीतील थोरला वाडा येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
सहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात काय केले, असा प्रश्न उपस्थित काही लोक करत आहेत. राज्यसभेचा सदस्य असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आपण निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील होतो. शिवाजी पुलाचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी, कोल्हापूरला पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा व्हावा म्हणून पाठपुरावा केला, असे सांगत संभाजीराजे यांनी, छत्रपती घराण्याला टीका काही नवीन नाही. अशा टीकेला आम्ही घाबरतही नाही. केव्हाही एका व्यासपीठावर या, उत्तर देण्यास आपण तयार असल्याचे स्पष्ट केले.

जनतेची दिशाभूल करण्यासाठी कोणीतरी काहीही बडबडत आहे; पण कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. मतदानाच्या माध्यमातून तेच त्यांना उत्तर देतील, असेही ते म्हणाले. सभेला नंदाताई बाभूळकर, गिरीजादेवी शिंदे, रामराजे कुपेकर, संग्राम शिंदे, अजित शिंदे, संयोगितादेवी शिंदे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button