कोल्हापूर : पाठिंबा देताना प्रतिगामी नव्हतो का? : संजय मंडलिक

कोल्हापूर : पाठिंबा देताना प्रतिगामी नव्हतो का? : संजय मंडलिक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गतवेळच्या निवडणुकीत 'आमचं ठरलंय' म्हणत पाठिंबा दिला होता. तेव्हा संजय मंडलिक प्रतिगामी नव्हते का? असा पलटवार महायुतीचे कोल्हापूर लोकसभा उमेदवार संजय मंडलिक यांनी आ. सतेज पाटील यांचे नाव न घेता केला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

'अजिंक्यतारा'च्या शाखा काढायचा विचार दिसतो

शाहू महाराज खासदार झाल्यानंतर तालुक्यात संपर्क कार्यालय काढून अजिंक्यताराच्या शाखा वाढविण्याचा सतेज पाटील यांचा विचार दिसतो, असा टोला लगावत खा. मंडलिक म्हणाले, परवापर्यंत पुरोगामी वाटणारा अचानक त्यांना मी प्रतिगामी कसा वाटतो. स्वत: काही केले तर बरोबरच इतरांनी भूमिका बदलली की, त्यांना चुकीचे ठरविणारी प्रवृत्ती थांबवली पाहिजे. एकदा कुस्तीसाठी मैदानात उतरल्यावर डाव टाकावे लागतात. तेव्हा पुढे कोण आहे, हे पाहिले जात नाही. शाहू महाराज वारसदार म्हणून ज्या पद्धतीने आले त्याच पद्धतीने त्यांचा खासदार होण्याचा राजहट्ट आहे; पण कोल्हापूरच्या विकासासाठी जनतेला महायुती हवी आहे.

घाटगे-मुश्रीफ मांडीला मांडी लावून बसल्यास तुम्हाला काय अडचण?

धनंजय महाडिक संजय मंडलिकांचा प्रचार करीत आहेत. हा समजूतदारपणा आहे. मुश्रीफांना जेलमध्ये पाठवण्याचे स्वप्न पाहणारे समरजितसिंह घाटगे मुश्रीफ यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. तुम्हाला काय अडचण आहे, असा सवाल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना केला. तुम्ही फूट पाडण्याचे काम केले. फूट पाडण्यामुळेच तुम्ही विजयी होत आलात. फूट पडलेले सर्वजण एकत्र आले की तुम्ही घाबरता, असा टोलाही त्यांनी लगावला.

सतेज पाटील यांनी मंडलिक यांच्याबाबत एक वार केला, तर शंभर वार होतील, असे वक्तव्य करायला नको हवे होते. यापूर्वी 'आमचं ठरलंय' म्हणून पाठिंबा दिला असताना आता पुरोगामी प्रतिगामी अशी चर्चा कशी काय करू शकता, असा सवाल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

यावेळी खा. धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, समरजितसिंह घाटगे, आरपीआयचे उत्तम कांबळे, गायत्री राऊत यांची भाषणे झाली. आ. राजेश पाटील, शरद कणसे, माजी आमदार के. पी. पाटील, चंद्रदीप नरके, महेश जाधव, विजय जाधव, सोमनाथ घोडेराव प्रा. जयंत पाटील, सुजित चव्हाण, वीरेंद्र मंडलिक, जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, भूषण पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण-पश्चिम राहुल देसाई, उत्तर विधानसभा प्रमुख सत्यजित कदम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष देसाई, महिला जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम यांच्यासह शिवसेनेच्या संजना मंडलिक, शिवानी मंडलिक, मंगल साळुंखे, पवित्रा रांगणेकर राष्ट्रवादीच्या जाहिदा मुजावर व रेखा आवळे यांच्यासह जोगेंद्र कवाडे गटाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक राहुल चिकोडे यांनी केले. राजेखान जमादार यांनी आभार मानले.

महिलांची मोटारसायकल रॅली

दरम्यान, उद्घाटन कार्यक्रमापूर्वी महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना व इतर घटक पक्षांतील नारीशक्तीतर्फे मोटारसायकल रॅली काढण्यात आली. गुढीपाडव्याचा सण असूनही महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गांधी मैदान येथून सुरू झालेल्या या रॅलीची प्रचार कार्यालयासमोर सांगता झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news