Lok Sabha Election 2024 : विधानसभेची जोडणी करीत समर्थकांचा प्रचार

Lok Sabha Election 2024 : विधानसभेची जोडणी करीत समर्थकांचा प्रचार

नेत्यांची निवडणूक होते मात्र आमच्या जोडण्या आम्हालाच करायला लागतात, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत स्थानिक पातळीवरचे नेते 'तुमचं हुईल… आमचं काय?' अशा सावध भूमिकेत आहेत. विधानसभेच्या जोडण्या घालतच त्यांचा प्रचारातील सहभाग निश्चित होणार आहे. त्याचवेळी नेत्यांचा कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आवडता कार्यकर्ता कोण, तो आपला आहे का, याची चाचपणी केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर ऑक्टोबरमध्ये म्हणजे चार महिन्यांतच विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. आपल्याला डोईजड होणार नाही अशाच पद्धतीने नेत्यांची आजवरची वागणूक राहिली आहे. त्यामुळे आता तालुका तालुक्यातील नेतेही सावध भूमिकेत आहेत. यामध्ये गेल्यावेळच्या निवडणुकीचा हिशेब मांडला जात आहे. आपल्याला आपल्या नेत्यांनी मदत केली का, आपल्यासाठी किती सभा घेतल्या, किती निधी दिला, यासह सगळ्याच गोष्टींचा हिशेब मांडला जात आहे.

विधानसभेला 'उत्तर'मध्ये उमेदवार कोण, याचीच चर्चा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव आमदार आहेत. मात्र, पुढची विधानसभेची गणिते येथे अवलंबून आहेत. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी महादेवराव महाडिक यांना महापालिका सत्तेपासून रोखले. मात्र, मुश्रीफ आणि महाडिक आता एक झाल्यामुळे सतेज पाटील यांना महापालिका जिंकण्यासाठी मालोजीराजे हे एकमेव सहकारी आहेत. भावी काळात कोल्हापूर उत्तरमध्ये मालोजीराजे किंवा त्यांच्या पत्नी मधुरिमाराजे काँग्रेसच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या तर आश्चर्य वाटायला नको, अशी परिस्थिती आहे.

शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर हे विधानसभेसाठी प्रबळ दावेदार आहेत. ते प्रचारात ज्या प्रकारे सक्रिय झाले आहेत, ते पाहता विधानसभेसाठी ते इच्छुक आहेत. भाजप, अजित पवार राष्ट्रवादी त्याचबरोबर महाडिक फॅक्टर त्यांच्या मागे उभारावा, असे नियोजन ते करीत आहेत. गेल्या निवडणुकीत सत्यजित कदम भाजपचे उमेदवार होते. त्यांची उमेदवारी महाडिक किती ताकद लावतात, त्यावर अवलंबून असेल. शिंदे हे कोल्हापूरच्या जागेसाठी आग्रही असतील. मात्र, अंबाबाईच्या गावात भाजपला आपला झेंडा रोवायचा आहे, हे पोटनिवडणुकीत भाजपने ज्या प्रकारे ताकद लावली, त्यातून सिद्ध झाले आहे.

'दक्षिणे'त पाटील-महाडिक आखाडा

कोल्हापूर दक्षिणला पक्ष नावालाच आहे. येथे सतेज पाटील आणि महाडिक गट असे दोनच पक्ष आहेत. त्यांच्यातच चुरस आहे. ते ज्या पक्षात तोच त्यांच्या समर्थकांचा पक्ष अशी स्थिती आहे. एकदा काँग्रेसचे सतेज पाटील, दुसर्‍यांदा भाजपचे अमल महाडिक, तर तिसर्‍यांदा काँग्रेसचे ऋतुराज पाटील येथून आमदार झालेत. आता ऋतुराज पाटील यांच्या विरुद्ध अमल महाडिकच दंड थोपटतील. यावेळी त्यांच्या मागे शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद असेल. तर ऋतुराज यांच्या मागे ठाकरे शिवसेना व शरद पवार राष्ट्रवादीची ताकद असेल. येथील कुस्ती नेहमीच चटकदार आणि काटाजोड असते. आताही ती तशीच होईल. त्यामुळे लोकसभेच्या आखाड्यात पाटील आणि महाडिक विधानसभेसाठीची ताकद आजमावत आहेत.

'करवीर'मध्ये भोगावतीपासूनच पी. एन. यांच्या विधानसभेच्या जोडण्या

'करवीर'ला काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनी भोगावतीपासूनच विधानसभेच्या जोडण्या केल्या आहेत. शाहू महाराज यांच्या प्रचारात स्वतः पी. एन पाटील, मुलगा, सून सगळेच सक्रिय असून, ते यातून आपल्या विधानसभेचा मार्ग अधिक मजबूत करीत आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते संपतराव पवार यांच्याशी असलेले राजकीय वैर संपवून पी. एन. पाटील यांनी विरोधकांना खिंडीत गाठले आहे. राज्यात शिंदे सरकार सत्तेवर येताच मूळच्या शिवसेनेकडून आपल्याला संधी मिळणे अशक्य असल्याचे जाणून चंद्रदीप नरके यांनी अगोदरच शिंदे शिवसेनेत आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे पाटील-नरके यांच्यातच आखाडा रंगणार आहे. भाजप या मतदारसंघात काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचे आहे. महाडिक गटाची भूमिकाही येथे महत्त्वाची असेल. पी. जी. शिंदे, अरुण नरके हे काय भूमिका घेणार, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.

कागल ः मुश्रीफ-घाटगे लोकसभेेला एकत्र; विधानसभेला विरुद्ध

कागल म्हणजे निवडणुकीसाठी अखंड धगधगता अग्निकुंडच. कागलला कायमचे निवडणुकीचे वातावरण असते. सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्या गटातील चुरशीत सोयरिक जुळवितानाही गट कोणता हे पाहिले जात होते, इतकी टोकाची राजकीय ईर्ष्या. आता येथे राजकीय परिस्थिती बदलली आहे. 2019 मध्ये परस्परांविरुद्ध लढलेले हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे आता एका व्यासपीठावर एकेकाळी त्यांचे समान शत्रू असलेल्या मंडलिक यांचा प्रचार करीत आहेत. तर संजय घाटगे हे काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय आहेत. हसन मुश्रीफ पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे, तर लोकसभेच्या प्रचार मेळाव्यात घाटगे यांच्या विजयाच्या घोषणा देणार्‍यांना समरजित घाटगे यांनी विधानसभेच्या वेळी तुम्हाला मी ही संधी देणार असल्याचे सांगून विधानसभेची आपली उमेदवारी बळकट केली आहे.

राधानगरी -भुदरगड उमेदवार फायनल, पक्ष नंतर ठरणार

याच अग्निकुंडाची दुसरी शाखा म्हणजे राधानगरी-भुदरगड. तेथे सध्याचे प्रतिस्पर्धी हे एकेकाळी एकाच गटातील. के.पी. पाटील, ए. वाय. पाटील आणि प्रकाश आबिटकर हे एकेकाळी एकाच मोटारीतील सहप्रवाशी. मात्र, आता त्यांच्या वाटा आणि मोटारीही वेगळ्या झाल्या आहेत. प्रकाश आबिटकर हे शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत. दरात लय भारी म्हणून के. पी. पाटील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांचा पक्ष निवडणुकीपूर्वी ठरेल. ए. वाय. पाटील विधानसभा लढणार का, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी आबिटकर व के. पी. हे मंडलिक यांच्या प्रचारात आहेत. विधानसभेसाठी मंडलिक कोणाचे नाव घेणार, यावर कोण किती ताकद लावणार, हे निश्चित होईल. राहुल देसाई भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. ते विधानसभेला इच्छुक आहेत. दिनकरराव जाधव गटाची भूमिका महत्त्वाची असेल.

आजरा-चंदगड इच्छुक उदंड

आजरा-चंदगडमध्ये जोडण्या सुरू झाल्या आहेत. मंडलिक यांचे मेहुणे राजेश पाटील मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. ते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. शिवाजीराव पाटील, भरमू सुबराव पाटील व संग्रामसिंह कुपेकर हे भाजपमध्ये आहेत. विनायक पाटील, गोपाळराव पाटील, जयवंतराव शिंपी काँग्रेसकडे आहेत. संध्यादेवी कुपेकर व नंदाताई बाभूळकर शरद पवार राष्ट्रवादीकडे आहेत, तर जनता दलाच्या स्वाती कोरी या महाविकास आघाडीबरोबर आहेत, असे चित्र आहे. आजर्‍यात अशोक चराटी गट भाजपकडे, सुधीर देसाईंचा गट अजित पवार राष्ट्रवादीत, तर सुनील शिंत्रे ठाकरे शिवसेनेत, तर जयवंतराव शिंपी काँग्रेसकडून कार्यरत राहण्याची चिन्हे आहेत. येथे प्रत्येक जण आपली ताकद आजमावत आहेत. इथे उमेदवार कोण आणि कोण नेता कोणाच्या पाठीशी राहणार हे येणारा काळच ठरवेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news