Balumama Rathotsava : भंडाऱ्याच्या उधळणीत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात

Balumama Rathotsava : भंडाऱ्याच्या उधळणीत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात
Published on
Updated on


मुदाळतिट्टा: बाळूमामा भंडारा उत्सवातील महाप्रसादाकरिता १९ बग्गीतील (कळप) मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रित करून बाळूमामाच्या रथातून विधीपूर्वक आदमापूरकडे नेण्याचा कार्यक्रम धार्मिक व भक्तीमय वातावरणात पार पडला. रथाच्या मिरवणुकीसाठी हजारो भाविक उपस्थित होते. बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करत, भंडाराची मुक्तहस्ते उधळण, ढोलकैताळाच्या गगनवेधी आवाजात राधानगरी- निपाणी मार्गावर निढोरी, आदमापूर अवघ्या दीड किलोमीटरच्या अंतरावर हा रथोत्सव सुमारे ४ तास चालला. बाळूमामा देवालयाचे मानकरी कर्णसिंह धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली. Balumama Rathotsava

भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो. बाळूमामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांच्या दुधाची घागर महाप्रसादामध्ये वापरायचे. तीच प्रथा आजही भाविकांनी कायम ठेवली आहे. Balumama Rathotsava

राज्य आणि परराज्यातील अनेक भागात राहत असलेल्या बाळू मामांनी जतन केलेली बकऱ्या १९ ठिकाणी बग्गी (दीड ते दोन हजार बक-यांचा कळप) च्या रूपात असतात. प्रथेप्रमाणे भंडाऱ्याच्या निमित्ताने महाप्रसादाच्या आदल्या दिवशी या सर्व बग्गी निढोरीत एकत्र आल्या. या बगीच्या घागरींचे भाविक ग्रामस्थ महिलांनी औक्षण करून स्वागत केले.

आदमापुरातून बाळूमामा देवस्थानच्या रथाचे निढोरीत आगमन झाले. यात्रेसाठी आलेले भाविक वेदगंगेत स्नान करून मारुती देवालयात जमले. येथूनच बाळूमामांनी आपल्या भक्ताकडे सुपूर्द केलेल्या घागरीसह अन्य बग्गीतील दुधाच्या घागरी मानाच्या रथासह आदमापुराकडे रवाना झाल्या. द्वादशी दिवशी सकाळी मानाच्या घागरीतून बाळूमामांना दुग्धाभिषेक घालण्यात येणार आहे. उर्वरित घागरीतील मेंढ्यांचे दूध महाप्रसादामध्ये वापरले जाणार आहे.

कर्नाटक, औरनाळ, देवगड, मिरजमधून आलेल्या दिंडीतील भाविक भक्त या ठिकाणी थांबून रथाबरोबर पुढे मार्गस्थ झाले. उत्साही भक्तांनी जेसीबीतून भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी मार्गावर नक्षीदार रांगोळी, रंगी- बेरंगी फुलांची पखरण, कीर्तन- प्रवचन बरोबर टाळ-मृदंगाचा गजर, ढोल- ताशाचा दणदणाट, भंडाऱ्यांची मुक्त उधळण करीत 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं!' आदमापूर च्या राजांचे चांगभलंचा जल्लोष करण्यात आला.

निढोरी, आदमापूर येथील बाळूमामा भक्त सेवकांमार्फत सर्व भक्तांना मोफत खिचडी, फळे, ताक व सरबत पुरवण्यात आले. अन्न दान ही करण्यात आले. या मिरवणुकीमध्ये धैर्यशील भोसले, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंत पाटील, विजय गुरव, प्रशासकीय समिती सदस्य रागिणी खडके यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Balumama Rathotsava : दुधाच्या घागरी नेण्याची प्रथा …

महाराष्ट्र- कर्नाटकसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूरच्या संत सद्गुरु बाळूमामांच्या भंडारा उत्सवापैकी तेथून दीड कि. मी. वर असलेल्या निढोरीत रथातून दुधाच्या घागरी नेण्याचा धार्मिक सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडण्याची प्रथा रूढ झाली आहे. धनगर बांधवांनी एक कोटी रुपये खर्च करून मंदिरास प्रदान केलेल्या रथामध्ये १३८ किलो वजनाची बाळूमामाची चांदीची ५० लाखांहून अधिक किंमतीची मूर्ती विराजमान केली होती. भंडाऱ्याच्या उधळणीमुळे रस्ता पिवळाधमक झाला होता.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news