जयसिंगपूर/दानोळी, पुढारी वृत्तसेवा : दानोळी (ता. शिरोळ) येथील उमळवाड रोडवरील पहिला ओढा परिसरात शेतातील गोठ्यात वस्तीला असणार्या दाम्पत्याच्या गळ्यावर कोयता ठेवून गळ्यातील मंगळसूत्र, पैंजण, जोडवी, कानातील वेल असे दीड तोळ्यांचे दागिने व मोबाईल अशी जबरी चोरी केल्याची घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. ऐन यात्रेच्या कालावधीत चोरीची घटना घडल्याने दानोळी परिसरात खळबळ उडाली आहे.
दानोळी येथील मारुती मल्हारी कारंडे यांचा उमळवाड रोडवर शेतात जनावरांचा गोठा आहे. गतवर्षी यात्रा दरम्यान कारंडे यांचे बोकड चोरीला गेले होते. सध्या दानोळी येथे यात्रा सुरू आहे. म्हणून गेले आठ दिवस रात्री मारुती व पत्नी प्रतिभा हे शेतावर वस्तीला जातात. मंगळवारी गावची यात्रा असल्याने सोमवारी रात्री उशिरा ते वस्तीला गेले होते. मध्यरात्री दारात काहीतरी आवाज होत असल्याने मारुती यांनी दरवाजा उघडला. तेवढ्यात चोरट्यांनी दारावर लाथ घालून मारुती यांना खाली पाडले. तीन चोरट्यांनी आत प्रवेश करून पती-पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर दोघांच्या गळ्यावर कोयता ठेवून प्रतिभा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, पैंजण, जोडवी, कानातील वेल असा दीड तोळ्यांचा एक लाख 4 हजार 500 रुपयांचा ऐवज, मारुती यांचा मोबाईल व गाडीची किल्ली घेऊन चोरटे पसार झाले.
या घटनेची माहिती कळताच यात्रा कमिटीने भेट देऊन पाहणी केली. कारंडे पती-पत्नीला दानोळी प्राथमिक आरोग्य केंद्र उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसपाटील प्रशांत नेजकर यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. श्वान पथक, ठसेतज्ज्ञ यांना पाचरण करण्यात आले.
दरम्यान, जयसिंगपूर पोलिसांनी परीसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. त्या आधारे चोरट्यांच्या तपासासाठी पथके तैनात केली आहेत. मंगळवारी वरीष्ठ पोलिस अधिकार्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. याबाबतची फिर्याद मारुती मल्हारी कारंडे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.