ड्रग्ज कनेक्शन : कवठेमहांकाळ, तासगावला 7 ठिकाणी छापेमारी

ड्रग्ज कनेक्शन : कवठेमहांकाळ, तासगावला 7 ठिकाणी छापेमारी
Published on
Updated on

कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील इरळी ( ता. कवठेमहांकाळ) हद्दीमधील 245 कोटींच्या ड्रग्ज निर्मिती आणि हस्तगत केलेल्या साठ्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने तपासाची व्याप्ती वाढविली आहे. पथकाने कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यांत सोमवारी 7 ठिकाणी छापेमारी केली. अटक केलेल्या संशयितांसह नातेवाईकांच्या घरांची झडती घेतल्याने खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा क्राईम ब्रँचचे पथक मुंबईला रवाना झाले.

कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यांतील तासगाव, बलगवडे, सावळज, मांजर्डे, कवठेमहांकाळ, आरेवाडीसह 7 गावांतील छापेमारीबाबत पथकाने गोपनियता पाळली होती. स्थानिक पोलिस यंत्रणांनाही कारवाईची खबरबात लागू न देण्याची खबरदारी घेतली होती. या कारवाईवेळी पथकासमवेत संशयित प्रवीण शिंदे व प्रसाद मोहिते हजर होते.

मुख्य संशयित प्रवीण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे (वय 35) याच्या बलगवडे (ता. तासगाव) येथील घराची झडती घेण्यात आली. शिंदे याचे काही वर्षांपासून मुंबईला वास्तव्य असल्याने त्याच्या संपर्कात असलेल्यांकडे चौकशी करण्यात आली. पाच-सहा वर्षांपूर्वी संशयिताचे नातेवाईकांशी मतभेद झाले होते. त्यामुळे बहुतांश जणांचा त्याच्याशी संपर्क राहिलेला नाही. त्यामुळे शिंदे याच्या कारनाम्यांची माहिती मिळू शकली नाही.

प्रवीण शिंदेने 45 लाखांना खरेदी केला बंगला

प्रवीण शिंदे याने कवठेमहांकाळ परिसरात विश्वासू नातेवाईकाच्या नावे 40 ते 45 लाख रुपये किमतीचा बंगला खरेदी केला आहे. संबंधित नातेवाईकाची चौकशी करून पथकाने बंगल्याची तपासणी केली. बंगला खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम कशी उपलब्ध करण्यात आली, याचीही विचारणा करण्यात आली; मात्र नातेवाईकाकडून तपशील मिळू शकला नाही. संबंधितांना चौकशीसाठी नोटीस लागू करण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजते.

घरझडतीत संशयास्पद वस्तू, मशिनरी हस्तगत

छापेमारी आणि संशयितांच्या घरांच्या झडतीत काही संशयास्पद वस्तू आणि छोट्या मशिनरीही हाती लागल्या आहेत. ड्रग्ज निर्मिती आणि तस्करीप्रकरणी अटक केलेल्या संशयितांनी दीड-दोन वर्षांत खरेदी केलेल्या मालमत्तांची माहितीही महसूल खात्याकडून घेण्यात येत आहे. शिवाय बँक खात्यांतील उलाढालीबाबतही वरिष्ठ स्तरावर माहिती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news