महा-स्वयं पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार ऑनलाईन शिक्षण! | पुढारी

महा-स्वयं पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार ऑनलाईन शिक्षण!

प्रवीण मस्के

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना परवडणार्‍या शुल्कात व त्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन महा-स्वयं पोर्टलची निर्मिती सुरू आहे. याबाबत पाच प्रमुख विद्यापीठांमध्ये करार झाला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सुमारे 2 लाख 50 हजारांहून अधिक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकणार आहेत.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अनेक आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. 60 टक्के अभ्यासक्रम प्रत्यक्ष, तर 40 टक्के ऑनलाईन शिक्षण देण्याचा समावेश आहे; परंतु राज्यात दर्जेदार ऑनलाईन शिक्षण सर्वच विद्यापीठांमध्ये देण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासन व शिवाजी विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.

करारानुसार महा-स्वयं पोर्टल विकसित करण्याचे काम सुरू आहे. यासाठी राज्यस्तरीय समिती गठित केली आहे. मुक्त विद्यापीठ या कोर्सेसचे व्यवस्थापन करणार आहे. महा-स्वयं पोर्टलद्वारे भारतीय ज्ञान कौशल्यावर आधारित 40 ऑनलाईन कोर्सेस विकसित केले जाणार आहेत. ऑनलाईन लेक्चर्स, व्हिडीओ यांचा समावेश असेल. अपार आयटी रजिस्टर असणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश असणार आहेत. कोर्स पूर्ण केल्यानंतर ते क्रेडिट पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी उपयोगी ठरणार आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा राज्यातील 40 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

Back to top button