दुचाकीचे हप्ते न भरल्याच्या वादातून गुंड तडाखेचा खून | पुढारी

दुचाकीचे हप्ते न भरल्याच्या वादातून गुंड तडाखेचा खून

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित बाळू तडाखे (वय 25, रा. साईट क्र. 102) याचा चाकूने गळा चिरून निर्घृण खून केल्याप्रकरणी तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत. याप्रकरणी राहुल विनोद पाथरवट, संदेश विनोद पाथरवट या दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली आहे, तर त्यांचा साथीदार नाथा ऊर्फ शंकर पुंडलिक जावीर (तिघे रा. साईट नं. 102) हा पसार झाला आहे. मोटारसायकलचे हप्ते भरण्यावरून झालेल्या वादातून तडाखे याचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली. याची माहिती गावभागचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.

रोहित तडाखे व संशयित राहुल पाथरवट हे मित्र होते. पाथरवट याने तडाखे याच्या नावे कर्ज प्रकरण करून दुचाकी घेतली होती; परंतु हप्ते न भरल्याने बँकेचे वसुली पथक रोहितच्या घरी येत होते. त्यामुळे रोहितने हप्ते का भरत नाहीस, अशी विचारणा केली. त्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. शुक्रवारी रात्री रोहित व राहुल यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला. त्यातूनच राहुल, संदेश व शंकर या तिघांनी धारदार चाकूने रोहितवर हल्ला केला. त्यामध्ये रोहितच्या दंडावर व गळ्यावर वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी रोहितचा गळा इतका चिरला होता की, त्याच्या कंठाचे केवळ हाड दिसून येत होते.

याबाबतची फिर्याद रोहितची आई श्रीमती राधा बाळू तडाखे (40) यांनी दिली आहे. रात्री उशिरा तातडीने हालचाली करीत पोलिसांनी राहुल पाथरवट, संदेश पाथरवट या दोघांना अटक केली. या दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता 2 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास स.पो.नि. विजय गोडसे करीत आहेत.

हल्लेखोरही जखमी

हल्ल्यावेळी झालेल्या झटापटीत संदेश पाथरवट याच्या हातालाही जखम झाली आहे. संशयित राहुल पाथरवट हा रेकार्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर गावभाग, शिवाजीनगर, शहापूर आणि हुपरी पोलिस ठाण्यांत विविध 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तिसरा संशयित शंकर जावीर याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Back to top button